काही वर्षांपूर्वी अनेक टोळय़ा बडय़ा उद्योगपतींकडून खंडणी वसूल करण्यासाठी त्यांच्या प्रियजनांना ओलीस धरणे वा त्यांचा कच्च माल अडवून ठेवणे असे नानाविध प्रकार करीत असत. टोळय़ांच्या या कारवाईवर मात करणे शक्य झाले असले तरी सध्या माहितीच्या महाजालातील खंडणीखोरीवर मात करणे कुणालाही शक्य झाले नाही. याचा फटका भारतीय व्यवसायांनाही बसत आहे. ही खंडणीखोरी म्हणजे भारतीय व्यवसायांना आतून पोखरून काढणारी सायबर कीड असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या नुकत्याच झालेल्या सायबर हल्ल्यातील रॅन्समवेअरने (खंडणीखोरविषाणू) आजवर ४३ हजार अमेरिकन डॉलर्स कमाविल्याचे सांगण्यात येत आहे. ही रक्कम फारच कमी असून सायबर खंडणीखोरांनी याहीपेक्षा जास्त रक्कम यापूर्वी कमावल्याचे उजेडात आले आहे.

जगभरात खंडणी मागण्याच्या उद्देशाने अशाप्रकारचे हल्ले सातत्याने होत असतात. विश्वासार्हतेला तडा जाऊ नये तसेच माहिती परत मिळावी या उद्देशाने हल्ल्याच्या बळी ठरलेल्या कंपन्या निमूटपणे सायबर हल्लेखोरांची पैशांची मागणी पुरवित असतात. याबाबत दाद मागण्यासाठी सायबर पोलीस ठाणी असली तरी कायद्याच्या मर्यादांमुळे त्यांच्याकडूनही फार अपेक्षा केली जात नाही.

आजमितीस भारतीय उद्योगांना खंडणीखोर विषाणू आणि डी-डॉस प्रकारचे हल्लेखोर सतावू लागले आहेत. खंडणीखोर विषाणू हे एखाद्या आज्ञावलीत प्रवेश करून संपूर्ण माहिती ‘एनक्रिप्ट’ करून टाकतात. हल्ल्याचे बळी ठरलेल्या व्यक्तीला पैसे भरल्यावर ती माहिती ‘डीक्रीप्ट’ करून मिळेल असे सांगतात. या प्रकारच्या हल्ल्यात खंडणीखोर कोण आहे, हे बळी ठरलेल्या व्यक्तीला माहिती नसते व बळी ठरलेली व्यक्ती वा संस्था कोण आहे हे हल्लेखोराला माहिती नसते. हल्लेखाराने पैसे भरण्यासाठी पाठविलेल्या ‘बिटकॉइन लिंक’वर क्लिक करून पैसे भरल्यास त्या संबंधित लिंकशी जोडलेल्या संगणकावरील अथवा नेटवर्कमधील माहिती ‘डीक्रीप्ट’ केली जाते अशी माहिती क्विकहील टेक्नॉलॉजी या अँटिव्हायरस कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजय काटकार यांनी सांगितले. अशा प्रकारचे हल्ले उद्योग जगतात वारंवार होत असतात; मात्र अनेकजण पुढे येत नाहीत, यामुळे ते फारसे कुणाला कळत नाही. याचबरोबर ‘डी-डॉस’ प्रकारच्या हल्ल्यात हल्लेखोर एखादी कंपनी लक्ष्य करून त्या कंपनीच्या सव्‍‌र्हरवर अमूक एका दिवशी हल्ला करणार असल्याचे सांगतो आणि जर हा हल्ला परतवून लावायचा असेल तर पैशांची मागणी केली जाते. हे हल्ले परेदशात सातत्याने घडत असतात आता भारतीय उद्योगांनाही अशा प्रकारच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही काटकर यांनी नमूद केले.

‘रॅन्समवेअर’ ही भारतीय उद्योगाला लागलेली सायबर कीड आहे. ती व्यवसायांना आतून पोखरत असल्याचे मत ज्येष्ठ सायबर विधिज्ञ अ‍ॅड्. प्रशांत माळी यांनी व्यक्त केले. सायबर सुरक्षेवर लाखो रुपये खर्च करूनही हे हल्ले होत असल्यामुळे अशा हल्ल्यांमध्ये कंपन्यांना माहिती मिळविण्यासाठी हल्लेखोरांना पैसे देण्यावाचून पर्याय राहात नाही. कारण पोलिसांकडे गेले तरी त्यांना न्याय मिळत नाही. याचबरोबर त्यांनी बिटकॉइनच्या माध्यमातून दिलेली खंडणी ही त्यांना कोणत्याही हिशोबात दाखवता येत नाही. यामुळे काळय़ा पैशांनीच हे व्यवहार करावे लागत असल्याचेही माळी यांनी नमूद केले. सुधारीत माहिती तंत्रज्ञान कायद्यात रॅन्समवेअरसाठी कायद्यात कठोर तरतूद करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.