मुंबई : चित्रपटांचे चित्रीकरण करताना अनेक किस्से घडतात. चित्रपटातील प्रत्येक दृश्य आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अशा अनेक सुवर्ण क्षणांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन सध्या मुंबईत भरले आहे. यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार, त्यांच्या कलाकृती, विशेष छायाचित्र, चित्रपटांची पोस्टर्स असा चित्रपटजगताच्या समृद्ध इतिहासाचा एक भव्य पट आपल्यासमोर उलगडत जातो.

मुंबई येथील नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून ‘लेन्स टू लेगसी’ या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन मुंबई येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामुळे चित्रपटप्रेमींना पडद्यामागील आणि चित्रीकरणादरम्यान टिपलेले असंख्य क्षण पाहण्याची संधी मिळणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय चित्रपट आणि छायाचित्रकार यांच्या समांतर प्रवासाचे दर्शनही या निमित्ताने चित्रपट रसिकांना होत असून दुर्गा खोटे, दिलीप कुमार, मधुबाला, मीना कुमारी, वैजयंतीमाला, राजेश खन्ना, देव आनंद, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, श्रीदेवी ते आताचे आघाडीचे नायक-नायिका यांची दुर्मीळ छायाचित्रे या प्रदर्शनातून रसिकांना पाहता येतील.

या प्रदर्शनात भारतीय सिनेमाच्या अगदी प्रारंभीच्या दिवसातील ‘संत तुकाराम’(१९३६), ‘कालिया मर्दन’ (१९१९) अशा चित्रपटांतील छायाचित्रेही पाहता येतात. यामुळे काळानुसार भारतीय चित्रपट कसा बदलत गेला, तसेच बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रभाव चित्रपटांवर कसा पडत गेला या गोष्टीही इतिहासासह दृश्य स्वरूपात उलगडत जातात. तसेच चित्रपटांच्या विषयांमध्ये आणि सादरीकरणात काळानुसार कसे बदल होत गेले हेही छायाचित्रांच्या माध्यमातून लक्षात येते.

मुंबईत १९४५ साली दामोदर कामत यांनी सुरू केलेल्या ‘कामत फोटो फ्लॅश’ यांच्या स्टुडिओच्या माध्यातून टिपलेले ५० आणि ६० च्या दशकातील चित्रपटांमधील जिवंत क्षण रसिकांना थेट त्या काळात घेऊन जातात. संग्राहक आणि कामत फोटो फ्लॅशच्या नेहा कामत यांच्यामुळे हा संग्रह उपलब्ध झाला आहे. तसेच चित्रपट संग्राहक आणि इतिहासकार एस. एम. एम. औसजा यांच्या दुर्मीळ संग्रहामुळे चित्रपटाचे एक संपूर्ण युग आपल्या पुढ्यात उभे राहते. तसेच या प्रदर्शनातून प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांनाही आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. छायाचित्रकार प्रदीप चंद्रा, शांतनू दास, सुधाकर ओलवे, अविनाश गोवारीकर आणि बंदीप सिंग यांच्या कलाकृती आपल्याला या प्रदर्शातून पाहता येतात. हे प्रदर्शन ३० जूनपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.