scorecardresearch

गायनासाठी विचार आणि स्वरांतील तन्मयता आवश्यक; प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांचे प्रतिपादन

‘लोकसत्ता गप्पां’चे नवे पर्व रविवारी नेहरू सेंटर येथे कलापिनी कोमकली यांच्याशी झालेल्या सुरेल गप्पांनी रंगले.

गायनासाठी विचार आणि स्वरांतील तन्मयता आवश्यक; प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांचे प्रतिपादन
प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली

मुंबई : मेंदूत विचार उमटल्याक्षणी गळय़ातून सूर निघण्यासाठी कुमार गंधर्वच व्हावे लागते. विचार आणि स्वरांमधील ही तन्मयता साधणे अवघड आहे. थोरामोठय़ांच्या सगळय़ाच गोष्टी आत्मसात करता येत नाहीत, याची पक्की जाणीव झाली की, अभ्यास आणि साधना यांतून आपला मार्ग शोधण्यासाठी आपण उद्युक्त होतो, असे मत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांनी रविवारी व्यक्त केले.

‘लोकसत्ता गप्पां’चे नवे पर्व रविवारी नेहरू सेंटर येथे कलापिनी कोमकली यांच्याशी झालेल्या सुरेल गप्पांनी रंगले. प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी कलापिनी यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.

यावेळी केसरी टूर्सच्या सुनीता पाटील यांच्या हस्ते कलापिनी कोमकली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

गायकाने बोलण्यापेक्षा गाण्यातून व्यक्त व्हावे असे सांगणाऱ्या कलापिनी यांनी कुमारजींच्या रचना, त्यांच्या बंदिशी यांचे सुरेल निरूपण केले. एक प्रतिभावंत गायक आणि एक वडील म्हणून कुमारजी कसे होते, घरात अव्याहत गाणे सुरू असतानाही आपल्याला शास्त्रीय गाण्याची ओढ उशिरा कशी लागली, कुमार गंधर्वाची प्रतिभा, त्यांची ताकद समजायला लागलेला वेळ आणि त्यासाठी आई वसुंधराताई यांची वेळोवेळी झालेली मदत अशा कित्येक आठवणी कलापिनी यांनी बंदिशीच्या सुरांची जोड देत केलेल्या मनमोकळय़ा गप्पांमधून जागवल्या.

कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली यांची गाण्यातील एकरूपता किती सहज आणि प्रभावी होती याची आठवण सांगताना एकमेकांना सामंजस्याने सुरेल साथ देत मैफल रंगवणारे ते एकमेव दाम्पत्य होते, असे कलापिनी म्हणाल्या. आपल्या आई-वडिलांची स्वरसाधना, त्यांनी शास्त्रीय संगीतात करून ठेवलेले कार्य इतके मोठे आहे की अजूनही आपण त्या अवकाशातील कण वेचत आहोत, अशा भावना कलापिनी कोमकली यांनी व्यक्त केल्या.

कधी कधी आपल्यालाही रचना स्फुरतात, असे सांगून कलापिनी यांनी स्वत: संगीतबद्ध केलेले ‘फागुन के दिन चार रे’ हे भजन गायले. ‘लोकसत्ता गप्पां’च्या या मैफलीची सुरुवात माळव्यामध्ये गणेशोत्सवात गायल्या जाणाऱ्या आरतीने झाली. ‘पावा मैं दूर से’ ही कुमारजींची श्री रागातील बंदिश, ‘मोर लायी रे’ या रचनेची जन्मकथा अशा बंदिशी कलापिनी कोमकली यांनी सादर केल्या. कार्यक्रमाची सांगता त्यांनी ‘सहज तुझी हालचाल’ या भैरवीने केली.

लोकांच्या तोंडावरची मुखपट्टी निघाली आणि पुन्हा लोकसत्ता गप्पांचा कार्यक्रम रंगला हा योगायोग आजच्या पाहुण्यांच्या बाबतीतही एका वेगळय़ा अर्थाने जुळून आला आहे, असे सांगूत मोठय़ा आजारपणातून उठल्यानंतर कुमारजींनी गाणे सुरू केले होते आणि आज करोनासारख्या मोठय़ा आजारातून बाहेर पडल्यानंतर रंगलेल्या लोकसत्ता गप्पांमध्ये कलापिनी यांचे येणे हा सुरेख योग आहे, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी कोमकली यांचा थोडक्यात परिचय करून दिला. संगीतात प्राण फुंकून ते पुढे नेण्यासाठी काम करणारे मोजके गायक असतात. कुमारजी त्या गायकांपैकी अग्रणी होते. कुमारजींच्या स्वरांचा दीर्घ वारसा कलापिनी यांच्याकडे आहे. एवढय़ा मोठय़ा कलाकाराच्या घरी जन्म झाला हे त्यांचे भाग्य, मात्र पुढची वाटचाल खडतर होती. मोठय़ा वृक्षाखाली छोटा वृक्ष अशी परिस्थिती होती. कलापिनी त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडल्या आणि त्यांनी कुमारजींच्या गायकीचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला, असे संगोराम म्हणाले.

 ‘लोकसत्ता गप्पां’चे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 01:06 IST

संबंधित बातम्या