ज्येष्ठ संपादक दिनकर रायकर यांचे निधन

रायकर यांना डेंग्यू आणि करोना रोगाने ग्रासले होते. त्यांना नानावटी इस्पितळात दाखल करण्यात आले.

मुंबई : ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहात प्रदीर्घ काळ पत्रकारिता केलेले ज्येष्ठ संपादक व ‘लोकसत्ता’चे माजी सहयोगी संपादक दिनकर केशव ऊर्फ डी. के. रायकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पत्रकारितेत तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ योगदान दिले.

रायकर यांना डेंग्यू आणि करोना रोगाने ग्रासले होते. त्यांना नानावटी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारानंतर डेंग्यूच्या आजारातून ते बरे झाले. गुरुवारी रात्री त्यांची करोना चाचणीही नकारात्मक आली. मात्र फुफ्फुसांचा संसर्ग बळावला. शुक्रवारी पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अंधेरी पूर्वेतील पारसीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या पत्नी, मुलगी शेफाली, मुलगा आशीष, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

रायकर हे मूळचे कोल्हापूरचे. इंग्रजी साहित्य, राज्यशास्त्रात पदवी घेऊन मुंबईत ते नोकरीसाठी आले. सेंट्र्ल टेलिग्राफ कार्यालयात त्यांना तात्पुरती स्वरुपाची तारबाबूची नोकरी मिळाली. त्यानंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये ते नागपूर कार्यालयात रुजू झाले. काही काळानंतर त्यांची  मुंबईत बदली झाली. ‘इंडियन एक्स्प्रेस’चे वार्ताहर ते मुख्य वार्ताहर असा त्यांचा प्रवास झाला.  पुढे ते ‘लोकसत्ता’चे सहयोगी संपादक झाले. सेवानिवृत्तीनंतर ते लोकमत समुहाचे औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणून रुजू झाले. मग मुंबई आवृत्तीचे संपादक, समूह संपादक व आता सल्लागार संपादक अशी लोकमत समुहासोबत त्यांची वाटचाल सुरू राहिली. पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

राज्यातील अनेक पत्रकारांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या माध्यम जगतातील एका व्यासंगी पत्रकार – संपादकाला तसेच समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या मनमिळावू व्यक्तीला आपण मुकलो आहोत. – भगसिंह कोश्यारी, राज्यपाल

मराठी पत्रकारितेच्या मूल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली.  – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian express senior editor dinkar raikar passes away akp

Next Story
‘जय भीम’ आणि ‘मरक्कर’चा ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत प्रवेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी