मुंबई : भारतीय परिचर्या परिषदेकडून बीएस्सी नर्सिंग, एएनएम, जीएनएम, डीपीएन, पीएचएन या परिचारिका संवर्गातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या सर्व अभ्यासक्रमांच्या नव्या शैक्षणिक सत्राची सुरूवात १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे तर अंतिम प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत देता येणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून परिचारिका संवर्गातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ५ मे तर अन्य अभ्यासक्रमांची परीक्षा ६ व ७ मे रोजी होण्याची शक्यता आहे. परीक्षा झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात येणार असली तरी विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश प्रक्रियेची माहिती जाणून घेण्याबाबत उत्सुकता असते.
भारतीय परिचर्या परिषदेने परिचर्या संवर्गातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत जाहीर केलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना नियोजन करणे शक्य होणार आहे. परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये प्रवेश परीक्षा १५ जून २०२६ पूर्वी आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ १ ऑगस्ट २०२६ तर प्रवेशाची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ असेल. ‘बी.एससी. (नर्सिंग) कार्यक्रमासाठी सुधारित नियम आणि अभ्यासक्रम, नियम २०२०’ या नियमाच्या आधारे परिचर्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
राज्यभरातील सरकारी व खासगी नर्सिंग महाविद्यालयांतील प्रवेश पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार असून पारदर्शक पद्धतीने गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. प्रवेशासंबंधी अटी व शर्ती तसेच प्रवेश परीक्षेची निकष बी.एस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या अधिकृत अभ्यासक्रम पुस्तिकेत नमूद करण्यात आले असून त्यांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल, असे भारतीय परिचर्या परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जागांपेक्षा अर्जदारांची संख्या अधिक राहण्याची शक्यता असल्याने स्पर्धा वाढण्याचे चित्र आहे.
प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख टप्पे
ऑनलाईन अर्ज नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अंतरिम गुणवत्ता यादी, हरकतींसाठी मुदत, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे, त्यानंतर प्रवेशाच्या एकापाठोपाठ एक फेऱ्या आणि संस्थेत प्रत्यक्ष प्रवेश नोंदणी. प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र मुदत देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील सूचना नियमितपणे तपासाव्यात, असे आवाहनही परिषदेकडून करण्यात आले आहे.

