मुंबई : भारतासाठी सगळ्यात जास्त महत्वाच्या असणाऱ्या हिंदी महासागराचे तापमान झपाट्याने वाढते आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने समुद्रात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती निर्माण होते. याचा सर्वाधिक फटका सागरी जीव, मासे आणि प्रवाळभिंतींना बसताना दिसत आहे. समुद्री जीवांना धोका निर्माण झाल्यास त्याचा परिणाम मासेमारीवर आणि पर्यायाने मासेमारीवर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे अशा भारतातील पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील लाखो नागरिकांना होऊ शकतो. अशी भीती वैज्ञानिकांकडून व्यक्त केली जात आहे. जागतिक पातळीवर हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. यामुळे त्याचे परिणाम भारतासह इतर देशांनाही भोगावे लागत आहेत.
यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’
या प्रशांत महासागरातील हवामान स्थितीचा प्रभाव असेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. यामुळे या वर्षीच्या हंगामात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे वाढते तापमान हा सध्याचा चिंतेचा विषय झाला आहे. यामुळे सागरी जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे.
‘मरीन हीट वेव्ह्ज इन द इंडियन ओशन: अ मेजर क्लायमेट इम्पॅक्ट ऑन मरीन मायक्रोअल्गी’ च्या अभ्यासानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढत असून यामुळे समुद्रातील जीवसृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, समुद्रातील तापमानवाढ ही तात्पुरती समस्या नसून ती जागतिक हवामान बदलाच्या दीर्घकालीन परिणामामुळे निर्माण झालेली स्थिती आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत असल्याने नैसर्गिक समतोल बिघडत आहे. तसेच उबदार पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे समुद्रातील जीवसृष्टीवर मोठा ताण येत असून जैवविविधतेला धोका निर्माण होणे तसेच अन्नसाखळीमध्ये बदल होणे असे परिणाम दिसून येत आहेत. तसेच एका अभ्यासा नुसार, जगातील महत्वाच्या महासागरांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थितीच्या (मरीन हिट वेव्ह ) घटनांमध्ये वाढ होत आहे.
जागतिक पातळीवर महासागरांचे तापमानही वाढले
विविध हवामान प्रारूपानुसार, २०२४ या वर्षात विक्रीमी उष्णेतची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये महासागरांचे तापमाना वाढले आहे. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसेस (सीथ्रीएस) कडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवाडीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये जागतिक
समुद्रपृष्ठ तापमान ( सी सरफेस टेम्परेचर ) हे सरासरी २१ अंश सेल्सिअस इतके होते. हे तापमान आतापर्यंत नोंदविले गेलेल्या सर्वाधिक तापमानापैकी दुसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे. याआधी एप्रिल २०२४ मध्ये इतिहासातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यावर्षी जागतिक समुद्रपृष्ठ तापमान २१.४ अंश सेल्सिअस इतके होते.
