मुंबई : सिग्नल पास एट डेंजर (एसपीएडी) प्रकरणातील दोषी मोटरमन, लोको पायलट हे रनिंग स्टाॅफमधील कर्मचारी मानसिक योग्यता चाचणीत अपयशी झाल्यास, त्यांना रनिंग स्टाफमधून काढण्यात येईल. तसेच त्यांना त्यांच्या मूळ वेतनांच्या ३० टक्के वेतन भत्ता न देण्याबाबतचा निर्णय रेल्वे मंडळाने कायम ठेवला आहे. याबाबत रेल्वे कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. तसेच, निवृत्ती कालावधीसाठी काही वर्षे शिल्लक असलेल्या मोटरमन, लोको पायलट यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सुमारे ५० मोटरमन, लोको पायलट यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. रेल्वेगाडी चालवताना मोटरमन, लोको पायलट लाल सिग्नल मोडून रेल्वेगाडी पुढे नेतात. तेव्हा सिग्नल पास एट डेंजरची (एसपीएडी) घटना घडते. मोटरमन आणि लोको पायलटच्या सिग्नल संबंधित चुकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून त्याला रनिंग स्टाॅफ काढून गैर रनिंग स्टाॅफवर नियुक्त करण्यात येते. यावेळी ते ३० टक्के वेतन घटकासाठी पात्र राहत नाहीत. हा महत्त्वाचा रनिंग वेतन भत्त्याचा भाग आहे. तसेच, काही वर्षात त्यांना पुन्हा रनिंग स्टाॅफमध्ये घेण्यासाठी मानसिक योग्यता चाचणी द्यावी लागते.
या चाचणीत मोटरमन, लोको पायलट अपयशी ठरल्यास त्यांना त्या पदासाठी अयोग्य ठरवले जाते. त्यामुळे अशांना ३० टक्के वेतन घटक मिळणार नाही. याचा परिणाम सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या आर्थिक लाभावर होतो. यामुळे रनिंग स्टाॅफमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अनेक मोटरमन कामाच्या दबावामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्यास इच्छुक आहेत. परंतु, मध्य रेल्वे प्रशासन त्यांचे अर्ज मंजूर करीत नसल्याने त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येत नाही.
माहिती अधिकाऱ्यांतून मिळालेल्या माहितीनुसार, २९ जुलै २०२५ पर्यंत ५१ मोटरमन, लोको पायलट यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. परंतु, त्यांच्या अर्जांना अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. मंजुरी मिळण्यास सुरुवात झाल्यास १०० हून अधिक मोटरमन स्वेच्छानिवृत्ती घेतील. ५० वर्षांचे मोटरमन स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी इच्छुक आहेत, असे एका मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मोटरमनने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
सिग्नल पास एट डेंजर (एसपीएडी) प्रकरणांमधील मोटरमन, लोको पायलट यांना मूळ वेतनांच्या ३० टक्के वेतन भत्ता न देण्याबाबत रेल्वे मंडळाची नकारघंटा कायम आहे. ज्या कर्तव्यांसाठी मोटरमन, लोको पायलट पात्र नाहीत, त्यांच्याशी संबंधित आर्थिक फायदा मिळत राहिला, तर सिग्नल पासिंगला प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे रेल्वे सेवेच्या सुरक्षेवर परिणाम होईल, असे २८ ऑक्टोबर २०२५ च्या पत्रात रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे.
एसपीएडी झाल्यानंतर, त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाते. त्याच्या वेतनात कपात केली जाते. तसेच त्याचा ग्रेड कमी केला जाते. मानसिक योग्यता चाचणी दिल्यानंतर तो नापास झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा आर्थिक लाभ न देण्याची कारवाई केली जाते. मोटरमनच्या एका चुकीसाठी त्याला दोन वेळा शिक्षा देणे अयोग्य आहे, असे रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
