मुंबई : भारतीय रेल्वेचा प्रवास वेगवान आणि प्रवाशांना परवडणारा आहे. इतर वाहतूक सुविधेच्या तुलनेत भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. भारतीय रेल्वेला केंद्राकडून ६० हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. म्हणजेच, प्रत्येक प्रवाशाला सुमारे ४५ टक्के सवलत मिळते. यामुळे भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात किफायतशीर वाहतुकीच्या साधनांपैकी एक आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये भारतीय रेल्वेसाठी सुमारे २.७८ लाख कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. २०२५-२६ या वर्षात विविध गंतव्यस्थानांसाठी ७१ हजार विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या असून त्यातून लाखो प्रवाशांनी प्रवास केला. ७५ स्थानकांवर प्रवाशांना सामावून घेण्यासाठी प्रतीक्षा कक्ष उभारले जात आहेत. ‘स्थानक पुनर्विकास कार्यक्रमा’अंतर्गत १,३०० स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. यापैकी १८० स्थानकांचे काम पूर्ण झाले. तर, ५०० स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि उर्वरित स्थानकांवरील काम वेगाने सुरू आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली. भारतीय रेल्वेमध्ये हाती घेण्यात आलेल्या अनेक प्रमुख संरचनात्मक सुधारणांवर माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र आणि मुंबईशी संबंधित प्रमुख ठळक बाबी
केंद्र सरकारकडून मुंबईच्या लोकलसाठी ३ हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. ज्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना परवडणारा प्रवास करणे शक्य होते. प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी मुंबईकरिता २३८ नवीन, पूर्णपणे स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलची निर्मिती केली जात आहे. मुंबई आणि पुणे यासह ४८ शहरांमध्ये प्रवासी क्षमता वाढवण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये नवीन फलाट, उपमार्गिकेवर (स्टेबलिंग लाइन्स), अतिरिक्त देखभाल – दुरुस्ती करणारी मार्गिका (पिट लाइन), कोचिंग टर्मिनल्स आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीचा समावेश आहे.
सात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे नियोजन सुरू
देशातील पहिला मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहे. तर, देशात सात बुलेट ट्रेन प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे. यामध्ये मुंबई – पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश असून, यामुळे प्रवासाचा वेळ केवळ ४८ मिनिटांपर्यंत कमी होईल. तसेच पुणे – हैदराबाद प्रकल्पाद्वारे प्रवासाचा वेळ सुमारे २ तासांपर्यंत कमी होणे अपेक्षित आहे.
नाशिक, उज्जैन, हरिद्वार, राजमहेंद्री आणि कुंभकोणम येथील कुंभमेळ्याच्या तयारीची कामे वेगाने सुरू आहेत. नाशिक कुंभमेळ्यासाठी नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकाणे या स्थानकांसाठी एक सविस्तर ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. १७ नवीन उड्डाणपूल आणि १९ नवीन भुयारी मार्गांचे बांधकाम सध्या सुरू आहे.
