मुंबई : देशभरातील वातानुकूलित (एसी) रेल्वे डब्यांमध्ये प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या बेडरोल साहित्याच्या चोरीत मोठी वाढ झाली असून गेल्या चार वर्षांत तब्बल १.२७ कोटी वस्तू गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. या चोरीमुळे लिनन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना १०४.५१ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसला आहे. तसेच पुढील प्रवाशांना वेळेवर बेडरोल उपलब्ध करून देण्याचे आव्हानही निर्माण झाले आहे. प्रवाशांकडून बेडरोल संच नेण्याच्या प्रकारामुळे भारतीय रेल्वेला दरवर्षी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

देशभरातील लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या बेडरोल (चादर, ब्लँकेट, उशी व टॉवेल) साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वातानुकूलित डब्यांमध्ये प्रवाशांना स्वच्छ बेडरोल संच उपलब्ध करून दिला जातो. मात्र प्रवास संपल्यानंतर अनेक प्रवासी चादर, ब्लँकेट, उशीचे अभ्रे किंवा टॉवेल परत न देता घेऊन जात असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. परिणामी नव्या बेडरोल साहित्याची वारंवार खरेदी करावी लागत असून त्याचा अतिरिक्त आर्थिक भार रेल्वेवर पडत आहे.

बेडरोल चोरीमुळे केवळ आर्थिक नुकसानच होत नाही, तर पुढील प्रवाशांना वेळेवर बेडरोल उपलब्ध करून देण्यातही अडचणी निर्माण होतात. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना बेडरोल साहित्य हे रेल्वेची मालमत्ता असल्याची जाणीव ठेवून ते प्रवासानंतर कर्मचाऱ्यांकडे परत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी तपासणी अधिक कडक करण्यासह जनजागृती मोहिमही राबविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

लिनन वस्तूंच्या चोरीत ५६ टक्क्यांनी वाढ

जानेवारी २०२२ ते मे २०२६ या कालावधीत भारतीय रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी किमान १.२७ कोटी बेडरोल वस्तूंची कथित चोरी केली. ज्यामुळे लिनन कंत्राटदारांना १०४ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले, असे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उघड झाले. देशाच्या १८ पैकी १६ रेल्वे विभागात२०२२ ते २०२५ या काळात लिनन वस्तूंच्या चोरीत ५६ टक्क्यांनी वाढ झाली.

कंत्राटदारांसाठी चिंतेची बाब वातानुकूलित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सामान्यतः एक बेडरोल किट दिले जाते. ज्यामध्ये दोन चादरी, एक ब्लँकेट, एक उशी, एक उशीचे कव्हर आणि एक चेहरा पुसण्याचा टॉवेल असतो. जरी चोरी झालेल्या वस्तूंची संख्या अंदाजे दर १ हजार प्रवाशांमागे एक असली तरी, एकूण नुकसान हे रेल्वे अधिकारी आणि लिनन पुरवणाऱ्या कंत्राटदारांसाठी एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. चार वर्षांच्या कालावधीत बेडरोल कंत्राटदारांना सुमारे १०४.५१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये, फेस टॉवेल्स सर्वाधिक प्रमाणात आढळले. चार वर्षांत ४६.५४ लाख टॉवेल्स गहाळ झाल्याची नोंद झाली. त्यानंतर ४१.१३ लाख बेडशीट्स, २३.५९ लाख पिलो कव्हर्स आणि १२.९५ लाख ब्लँकेट्सचा क्रमांक लागतो. उशा ही सर्वात कमी चोरीला गेलेली वस्तू होती. २.७६ लाख उशा गहाळ झाल्याची नोंद झाली. मुंबई विभागात ८.१७ लाख वस्तू हरवल्याची नोंद आहे.