मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होळीनिमित्त भारतीय रेल्वेवर विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. यावर्षी १,४१० होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन आहे. होळी सण साजरा करण्यासाठी देशातील विविध भागातून प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांमुळे मदत होईल.

मध्य रेल्वे देशभरातील विविध ठिकाणी २०९ विशेष रेल्वेगाड्या चालविणार आहे. जेणेकरून प्रवाशांना नातेवाईकांसोबत होळी साजरी करता येईल. या रेल्वेगाड्यांमध्ये वातानुकूलित विशेष, वातानुकूलितसह शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डब्याचे मिश्र संयोजन असलेल्या रेल्वेगाड्या आणि अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांमध्ये मुंबई नागपूर – मुंबई, मुंबई – रत्नागिरी – मुंबई, मुंबई – चिपळूण – मुंबई आणि इतर ठिकाणांचा समावेश असेल. या विशेष रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने प्रवासी सुविधा वाढवल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर पुरेशा संख्येने तिकीट खिडक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळा आणि थांब्यांची माहिती लवकरच कळवली जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाढत्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी, पश्चिम रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत २३१ सुट्टीकालीन विशेष गाड्यांच्या सेवांची घोषणा केली आहे. १ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत देशातील विविध ठिकाणी जाण्यासाठी या विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जातील. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि इतर प्रमुख प्रदेशांसह भारताच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रवाशांना प्रवासाचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात आरामदायी व सोयीस्कर प्रवासाची खात्री करण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी अपेक्षित असल्याने, पश्चिम रेल्वेवरील प्रमुख टर्मिनस, रेल्वेगाडी थांबणाऱ्या स्थानकात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. तसेच प्रवासीभिमुख सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, उधना, सुरत, अहमदाबाद आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्रमुख स्थानकांवर प्रवासी प्रतीक्षा क्षेत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत.

प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाशव्यवस्था, पंखे आणि सार्वजनिक घोषणा प्रणाली आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.