मुंबई : मुंबईत रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू होतात. त्यामुळे रेल्वे अपघातांमध्ये प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. काही मिनीच वेळ वाचविण्यासाठी रेल्वे प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे आता ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रवासी रेल्वे रुळ ओलांडत असलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून, तेथे भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहेय मात्र तरीही जिने चढण्याचे कष्ट आणि वेळेची बचत करण्यासाठी किंवा इच्छित लोकल पकडण्यासाठी प्रवासी सर्रास रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू अथवा काही प्रवासी जखमी होतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ‘शून्य मृत्यू मोहिमे’अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबविले. तसेच ‘यमराजा’चा पेहराव करून सुरक्षा जवानांनी ठिकठिकाणी रेल्वे रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले.

पादचारी पूल, सरकते जिने, उद््वाहनाचा वापर करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच सुरक्षा माहिती पत्रक स्थानिक नागरिकांना वाटून, फलकाद्वारे स्थानिकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच ठोस उपाययोजना करण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्यात येत असलेल्या ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्याच्या सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्या. रेल्वे रुळाच्या एका बाजूला लोकवस्ती आणि दुसऱ्या बाजूला शेतजमीन, शाळा, स्मशानभूमी किंवा इतर उपयुक्त आणि महत्त्वाची ठिकाणे असलेल्या ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत.

रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे भुयारी मार्ग बांधण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे रेल्वे भुयारी मार्ग बांधताना, सामान्य व्यक्तीला सायकल, मोटरसायकल आणि कामाशी संबंधित इतर वस्तू वाहून नेता येतील, याची खात्री असेल. यामुळे देशभरात रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळता येतील. भारतीय रेल्वेचे हे भुयारी मार्ग प्रवासी, पादचाऱ्यांसाठी वरदान ठरतील.

सुलभ आणि सुरक्षित संरचना

रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना देशातील या मोठ्या समस्येचे निराकरण पुढील ५-६ वर्षांत करण्याचे निर्देश दिले आहेत. हे भुयारी मार्ग केवळ १२ तासांत रेल्वे रुळांखाली बांधता येतील. नागरिकांना सहज वापर करता येईल अशी या भुयारी मार्गाची संरचना असणार आहे. या भुयारी मार्गामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना रेल्वेमंत्र्यांनी केल्या आहेत.