मुंबई : इराण-अमेरिका संघर्ष, युद्धामुळे अमेरिका-युरोपच्या विमान तिकिट दरातील वाढ आणि हवाई क्षेत्र निर्बंधामुळे यंदाच्या उन्हाळ्यात भारतीय तरुणाईने पर्यटनासाठी आशियाई देशांना पसंती दिली आहे. ओसाका, टोकियो, क्वालालंपूर, बँकॉक या ठिकाणांना भारतीयांची मागणी आहे. ””एअरबीएनबी””च्या अहवालानुसार आशियाई संस्कृती अनुभवण्यासाठी भारतीय पर्यटक उत्सुक आहेत.
प्रवासाची सुलभता, कमी वेळेत पर्यटनस्थळी पोहोचण्याच्या दृष्टीनेही पर्यटक क्वालालंपूर (मलेशिया), बुसान (दक्षिण कोरिया), बँकॉक (थायलंड) या आशियाई देशांना पसंती देत आहेत. ””जेन झी”” पिढी अशा पर्यटनस्थळांच्या निवडीत आघाडीवर असून, माहिती मिळवणे आणि बुकिंगमध्ये तरुणांचा ४० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. दरवर्षी तरुणांचा सहभाग ६० टक्यांनी वाढत आहे. ही पिढी प्रवासाला प्राधान्य देत असून महोत्सव, संगीत मैफली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सवांना विशेष पसंती देत आहे.
भारतीय प्रवाशांकडून ओसाकाबाबत माहिती शोधण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांनी वाढले असून, टोकियोसाठी ९० टक्के, तर बुसानसाठी ९५ टक्के वाढ नोंदवल्याची माहिती ””एअरबीएनबी””ने दिली. आग्नेय आशियामध्ये, क्वालालंपूरच्या शोधांमध्ये ५०, तर बँकॉककरिता ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कमी प्रवास वेळेत नव्या ठिकाणांचा अनुभव घेता येत असल्याने या ठिकाणांना पसंती मिळत आहे. येथे कौटुंबिक आणि समूह सहलींचे प्रमाण अधिक आहे.
भारतीय प्रवाशांना आवडणाऱ्या संस्कृतीची ओळख आणि एक नवीन ठिकाण शोधण्याची संधी आशियाई देशात आहे. वाढलेली कनेक्टिव्हिटी आणि लाँग वीकेंडमध्ये छोटी सहल आखण्याचा पर्याय, यामुळे आशिया भारतीय प्रवाशांसाठी आणखी आकर्षक बनत आहे.– अमनप्रीत सिंग बजाज, कंट्री हेड, इंडिया आणि दक्षिण-पूर्व आशिया,एअरबीएनबी.
वेगळी ठिकाणे शोधण्यावर भर
भारतीय प्रवासी आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतातही, हळूहळू ठरलेल्या आणि नेहमीच्या पर्यायांच्या पलीकडे जात आहे. केवळ लोकप्रियच नव्हे, तर अधिक एकांत, शांत ठिकाणे शोधत आहेत.
व्हिएतनाम, बालीची भूरळ
भारतीयांकडून व्हिएतनाम आणि बाली (इंडोनेशिया) या ठिकाणांना प्रचंड मागणी आहे, कारण हे दोन्ही देश स्वस्त, सुरक्षित आणि निसर्गसौंदर्याने नटलेले आहेत. बाली हे हनिमून आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे, तर व्हिएतनाम हे संस्कृती, इतिहास आणि साहसासाठी पसंतीचे ठिकाण आहे.
जयपूर, मेघालय, पुरीला प्राधान्य
भारतात, प्रवासी पारंपरिक लोकप्रिय ठिकाणांच्या पलीकडील ठिकाणे शोधत आहेत. तिरुवनंतपुरमसारख्या ठिकाणांच्या शोधात ९० टक्क्यांहून अधिक, तर जयपूर आणि मेघालयामध्ये प्रत्येकी ७० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली. पुरीमध्येही ३० टक्क्यांहून अधिक वाढ आहे. पर्यटन ठिकाणांमधील बदल, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही स्तरांवर निसर्ग आणि सांस्कृतिक समृद्धी देणाऱ्या ठिकाणांना वाढती पसंती वाढत आहे.
