मुंबई: भारतात वाढत्या हृदयरोगाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक संशोधन समोर आले आहे. भारतीयांमध्ये हृदयरोगाला कारणीभूत ठरणाऱ्या नव्या ‘मॉलिक्युलर’ म्हणजेच सूक्ष्म जैविक मार्गांचा शोध लागला असून या निष्कर्षांमुळे भविष्यात उपचारपद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हे संशोधन अमेरिकेत झाले असले तरी त्याचा केंद्रबिंदू पूर्णपणे भारतीय लोकसंख्या होती.

हे संशोधन अमेरिकेतील युनिर्व्हसिटी ऑफ ओक्लाहामा हेल्थ सायन्स सेंटर येथे करण्यात आले असून, त्याचे नेतृत्व धरमबीर संघेरा यांनी केले. या अभ्यासात भारतीय वंशाच्या सुमारे तीन हजार व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. विशेषतः पंजाबी शीख समुदायातील लोकांच्या रक्तातील घटकांचा सखोल अभ्यास करून हृदयरोगाशी संबंधित जैविक बदल समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

संशोधनात ‘लिपिड मेटाबोलाइट्स’ या चरबीशी संबंधित सूक्ष्म घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. हे घटक शरीरातील चयापचय, सूज आणि रोगप्रतिकारक यंत्रणेवर प्रभाव टाकतात. अभ्यासातून असे स्पष्ट झाले की काही विशिष्ट मॉलिक्युलर मार्ग हे थेट हृदयरोग, मधुमेह आणि स्थूलता यांसारख्या आजारांशी संबंधित आहेत. विशेष बाब म्हणजे, हे मार्ग यापूर्वी युरोपियन लोकसंख्येवरील संशोधनात आढळले नव्हते.

या अभ्यासात काही महत्त्वाचे लिपिड घटकही समोर आले. ‘एलपीसी ओ-१६:०’ हा घटक शरीरातील सूज वाढवण्याशी संबंधित असल्याचे दिसून आले, ज्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. तर ‘पीसी ३८:४’ हा घटक काही प्रमाणात हृदयरोगापासून संरक्षण देण्यास मदत करू शकतो, असे संकेत मिळाले आहेत. यावरून स्पष्ट होते की हृदयरोग केवळ कोलेस्टेरॉल किंवा जीवनशैलीपुरता मर्यादित नसून त्यामागे सूक्ष्म जैविक प्रक्रिया कार्यरत असतात.

हे संशोधन एका प्रतिष्ठित मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या निष्कर्षांमुळे ‘पर्सनलाइज्ड मेडिसिन’ म्हणजेच व्यक्तीनिहाय उपचारपद्धतीला मोठी चालना मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जनुकीय रचनेनुसार आणि जैविक घटकांनुसार उपचार ठरवता येतील, ज्यामुळे हृदयरोगाचे लवकर निदान आणि अधिक अचूक उपचार शक्य होणार आहेत.

भारतामध्ये हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, ताणतणाव आणि मधुमेहाचे वाढते प्रमाण यामुळे हा धोका अधिक गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत भारतीयांवर आधारित या संशोधनाचे महत्त्व अधिक वाढते. यामुळे हृदयरोगाच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्म जैविक प्रक्रियांवर आता अधिक प्रकाश पडत असून भविष्यात भारतीयांसाठी अधिक प्रभावी,अचूक आणि वैयक्तिकृत उपचारपद्धती विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.