पर्यटकांचा ओढा चीनकडे!

उन्हाळ्याच्या सुटीत युरोपवारी परवडत नाही असे पर्यटक थायलंड, मलेशिया, हाँगकाँग व सिंगापूर या देशांना पसंती देतात. मात्र, आता त्यात चीनची भर पडली आहे.

उन्हाळ्याच्या सुटीत युरोपवारी परवडत नाही असे पर्यटक थायलंड, मलेशिया, हाँगकाँग व सिंगापूर या देशांना पसंती देतात. मात्र, आता त्यात चीनची भर पडली आहे. गेल्या दोन वर्षांत चीनला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
भारतीय पर्यटकांची आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांची निवड ही आर्थिक क्षमतेवर आधारित आहे. कमीतकमी ५० हजार ते जास्तीत जास्त दीड लाख रुपये खर्चातील पॅकेज निवडण्यावर पर्यटकांचा भर असतो. त्यानुसार, ३२ हजारांपासून सुरू होणाऱ्या थायलंडवारीलाच पर्यटकांची जास्त पसंती मिळते. साधारणत: ४५ हजार रुपयांपर्यंत मलेशिया, बँकॉक आणि हाँगकाँगची टूर पर्यटकांना परवडत असल्याने या वर्षीही उन्हाळ्याच्या सुटीत मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांनी  तिथे गर्दी केली होती. ज्यांना युरोपवारी परवडत नाही अशा पर्यटकांची भिस्त दक्षिण-मध्य आशियाई देशांवरच असल्याचे ‘ईशान इंटरनॅशनल टूर्स’चे संचालक जितेंद्र गिरे यांनी सांगितले.     
या वर्षी इंडिगो एअरलाइन्सने थायलंड सेवा कमी केल्यामुळे पर्यटकांची गर्दी मलेशिया, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये सर्वाधिक होती, असे ‘मेक माय ट्रिप’तर्फे सांगण्यात आले. तर दक्षिण-मध्य आशियाई देश फिरून आलेल्या पर्यटकांसाठी चीनचा एक नवा पर्याय लोकांसमोर खुला झाला आहे. हाँगकाँगवारी करणाऱ्या पर्यटकांना चीनच्या शेंझेन शहरात फिरवले जाते. हाँगकाँगच्या उत्तरेला लागूनच शेंझेन असल्याने पर्यटक समुद्रमार्गे चीनच्या दक्षिणेला असलेल्या या शहरात पोहोचतात, असे जितेंद्र गिरे यांनी सांगितले. याआधी चीनला पर्यटनासाठी नेणाऱ्या पर्यटनसंस्थांचे प्रमाण कमी होते. आता ते वाढले असल्याने पर्यटकांना चीनचा पर्याय उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
युरोपला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले आहे. त्यापाठोपाठ मालदीव आणि मॉरिशसला जाणाऱ्यांची संख्या ३१ टक्के आहे. त्या तुलनेत चीनला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले. तर देशांतर्गत पर्यटनासाठीही उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये साहसी पर्यटन, सागरी मोहिमा आणि जंगल सफारीला वाढता प्रतिसाद असल्याचे ‘हॉलिडे आयक्यू’च्या हरी नायर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indians prefer china for tours