मुंबई : भारतीय नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील आजवरच्या सर्वाधिक यशस्वी आणि आदर्श म्हणवल्या गेलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या सीईओंना ४ डिसेंबर रोजी विस्कळीत आणि अतिविलंबाच्या सेवेबद्दल प्रवाशांची जाहीर माफी मागावी लागली. इंडिगो कंपनीच्या बाबतीत सध्या सुरू असलेला प्रकार अभूतपूर्व आहेच, पण यातून वेगाने विस्तारणाऱ्या या क्षेत्राच्या भविष्याविषयीदेखील अनेक प्रश्न उपस्थित होतात.
विविध घटकांमुळे भारतातील विमानसेवा गेले काही दिवस प्रभावित झाली. यात मुंबई, बंगळूरु, दिल्ली, हैदराबाद, पुणे या मोठ्या शहरांतील विमानतळांवर ‘चेक-इन’ प्रणालीत बिघाड झाल्यामुळे प्रवासी खोळंबले. तर काही वेळा थंडी आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहतूक सेवेवर परिणाम झाला. या दोन घटकांचा फटका प्राधान्याने एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्पाइस जेट या विमान कंपन्यांना बसला. तो काही प्रमाणात इंडिगो एअरलाइन्सलाही बसला. पण या विमान कंपनीची मूळ अडचण वेगळीच ठरली. वैमानिक आणि कक्ष कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांवर मर्यादा आल्यामुळे इंडिगोचा अवाढव्य पसारा सांभाळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच सध्या कंपनीकडे उपलब्ध नाही. या परिस्थितीत नजीकच्या काळातही सुधारणा होण्याची शक्यता कमीच.
हवालदिल इंडिगो
‘प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आपण कमी पडलो. त्यामुळे जाहीरपणे माफी मागतो’, या शब्दांत इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी हतबलता व्यक्त केली. विमानसेवा सुरळीत करण्यास प्राधान्य दिले जाईल. पण हे सोपे नाही, अशी कबुलीही एल्बर्स यांना द्यावी लागली. इंडिगोविरोधात अद्याप कुठेही जनक्षोभ उसळलेला नाही हे या कंपनीचे भाग्यच म्हणावे लागेल. कारण विस्कळीत सेवेची आकडेवारी ऊर दडपून टाकणारी आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून विमानांना विलंब होण्याचे प्रमाण नाट्यमयरीत्या वाढले. मंगळवार म्हणजे २ डिसेंबरपासून ५०० हून अधिक उड्डाणे रद्द झाली. यात एकट्या ४ डिसेंबर रोजीच २०० उड्डाणे रद्द झाली. इंडिगो कंपनी वक्तशीरपणाबद्दल आणि झटपट सेवेबद्दल ओळखली जाते. या प्रतिमेची गेल्या काही दिवसांमध्ये धूळधाण उडाली. एरवी या कंपनीची ८० टक्के उड्डाणे वेळेत होतात. पण १ डिसेंबर रोजी हे प्रमाण ५० टक्क्यांवर आले. ही घसरण २ डिसेंबर (३५ टक्के) आणि ३ डिसेंबर रोजीही (१९.५ टक्के) सुरूच होती. एका उड्डाणाला तर १० तास विलंब झाला.
बदललेल्या नियमांचा फटका
इंडिगोला अचानक मनुष्यबळाचा तुटवडा जाणवण्यामागे नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने कामाच्या तासांबाबत नव्याने बनवलेली नियमावली कारणीभूत ठरत आहे. ही नवी नियमावली दोन टप्प्यांमध्ये राबवली जात आहे. यातील पहिला टप्पा जुलै महिन्यात अमलात आला, तर दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाली. डीजीसीएने बनवलेल्या या नियमांअंतर्गत, वैमानिकाचे कामाचे तास ४८ वरून ३६ करण्यात आले आहेत. शारीरिक आणि मानसिक थकवा कमी व्हावा हा यामागील उद्देश. याशिवाय रात्री विमाने उतरवण्याची मुभा सहावरून दोनवर करण्यात आली आहे. दैनिक कामाचे ८ तास, साप्ताहिक कामाचे ३५ तास, मासिक कामाचे १२५ तास आणि वार्षिक १००० तास अशा मर्यादा घालून देण्यात आला आहेत. वैमानिकांना थकवा येऊन उड्डाणांमध्ये जोखीम निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात असली, तरी या व्यवस्थेमध्ये अधिक संख्येने वैमानिक आणि कर्मचारी लागणार हे उघड आहे. इंडिगोची या बदलासाठी तयारीच पुरेशी नव्हती. तशात नोव्हेंबर-डिसेंबर हा वाढीव उड्डाणांचा काळ मानला जातो. सुट्ट्यांच्या काळात जवळपास ६ टक्के उड्डाणे अतिरिक्त असतात. एकीकडे ही वाढीव उड्डाणे आणि दुसरीकडे नियमांच्या मर्यादेतून घटलेले वापरण्याजोगे मनुष्यबळ अशा दुहेरी कात्रीत इंडिगो सध्या अडकली आहे.
इंडिगोची रात्रीची उड्डाणेही सर्वाधिक आहेत. किंबहुना ते त्यांचे यशस्वी बिझनेस मॉडेल मानले जाते. आता रात्रीच्या उड्डाणांवरील मर्यादांचा दुहेरी फटका इंडिगोच्या सेवेला बसला. एकट्या नोव्हेंबर महिन्यात या कंपनीची १२३२ उड्डाणे रद्द झाली. तोच पाढा डिसेंबरमध्येही सुरूच राहिला. भारतीय प्रवासी विमान वाहतूक बाजारपेठेत इंडिगोचा हिस्सा ६० टक्के इतका आहे. केवळ देशातच नव्हे, तर आशियातही दिवसाला २३०० उड्डाणे इतका या कंपनीचा अजस्र पसारा आहे. देशांतर्गत ९० आणि परदेशातील ४५ शहरांमध्ये इंडिगोची विमाने जातात. यासाठी मोठ्या संख्येने विमाने लागतात आणि त्यासाठी मनुष्यबळही लागते. सध्या ते कमी पडत आहे.
बाकीच्या विमान कंपन्यांचे काय?
इतर कंपन्या म्हणजे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअरलाइन्स आणि स्पाइस जेट यांचा आकार इंडिगोइतका नाही. शिवाय या कंपन्यांची रात्रीची उड्डाणे तुलनेने कमी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील मर्यादांची फारशी झळ या कंपन्यांना इंडिगोच्या तुलनेत कमी प्रमाणात पोहोचली. गेल्या वर्षांमध्ये कार्यक्षम सेवेमुळे इंडिगोचा बाजारहिस्सा वाढत गेला. अधिकाधिक विमानेही घेतली गेली. तितक्या प्रमाणात वैमानिक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे, झटपट ‘टर्न अराउंड टाइम’मुळे एका दिवसभरात त्यांचे वैमानिक नेहमीपेक्षा अधिक उड्डाणे हाताळू शकतात. आतापर्यंत याविषयी काही नियम नव्हते. ते करण्याविषयी गतवर्षी जून महिन्यात विमान कंपन्यांची डीजीसीएबरोबर बैठक झाली. त्यावेळी नवीन नियमांच्या अंमलबजावणीस इंडिगोसह सर्वच कंपन्यांनी विरोध केला आणि अधिक मुदत मागितली. मात्र यंदा दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भात डीजीसीएला निर्देश दिल्यामुळे नियमांची अंमलबजावणी तातडीने करावी लागली. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ भरती इंडिगोकडून होऊ शकली नाही.
आणखी किती काळ सेवा विस्कळीत?
पुढील ४८ तासांमध्ये मनुष्यबळ नेमणुकीत सुसूत्रीकरण केले जाईल आणि विमानसेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जातील, असे इंडिगोकडून सांगितले गेले. पण विश्लेषकांना यावर फारसा भरवसा वाटत नाही. विमानसेवा सुरळीत होण्यास किमान फेब्रुवारी उजाडेल, असे बहुतेकांचे मत आहे. वैमानिकांच्या संघटनांनी इंडिगोच्या कमीत कमी मनुष्यबळाच्या जोरावर अधिकाधिक उड्डाणे हाताळण्याच्या धोरणावर टीका केली. केवळ नफेखोरीसाठी हे धोरण राबवले गेले, यात वैमानिकांवरील कार्यबाहुल्याचा विचार केला जात नव्हता. आता वैमानिकांवरील ताण कमी करण्याची वेळ आली त्यावेळी सेवाच कोलमडून पडली. याचे खापर नवीन नियमांवर फोडले जाईल आणि नियम शिथिल करण्याविषयी डीजीसीएवर दबाव आणला जाईल, अशी भीती वैमानिकांना वाटते. प्राप्त परिस्थितीत जोवर नवीन भरती होत नाही, तोवर इंडिगोची सेवा रडतरखडतच सुरू राहील अशी चिन्हे आहेत. बाजारातील सर्वांत मोठी विमान कंपनी असल्यामुळे याचा फटका अखेरीस प्रवाशांनाही बसेल हे नक्की.
siddharth.khandekar@expressindia.com
