मुंबई : इंधनावरील वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटातील विमान कंपन्यांनी लांब पल्याची वाहतूक बंद करण्यास सुरुवात केली आहे.इंडिगोने मँचेस्टर येथील विमानसेवा १ सप्टेंबरपासून तर हिथ्रो(लंडन) आणि ॲमस्टरडॅम येथील सेवा २७ ऑक्टोबरपासून तिकिटे विक्रीतून काढून घेतली आहेत. दिवाळीच्या तोंडावर इंडिगोने विमान वाहतूक थांबविल्याने दिवाळीकरिता मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

इराण-अमेरिका युद्धाचा मोठा आर्थिक फटका भारतीय विमान कंपन्यांना बसला आहे. त्यातच सर्वात मोठा फटका इंडिगोला बसला आहे. तोटा दिवसेंदिवस वाढत असल्याने इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाईस जेटचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या फेडेरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने (एफआयए) नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवर समान इंधन दर प्रणाली लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच विमान इंधनावरील ११ टक्के अबकारी शुल्क माफ करण्याची शिफारस केली आहे. तसेच विमान कंपन्यांना लवकर दिलासा दिला नाही तर विमान वाहतूक बंद करण्याची नामुष्की विमान कंपन्यांवर येईल असा इशारा देखील दिला होता. त्याच इशाऱ्याची अंमलबजावणी करण्यास सर्वप्रथम इंडिगोने सुरुवात केली आहे.

इंडिगोने वाढता तोटा कमी करण्यासाठी सप्टेंबर महिन्यापासून लांब पल्याच्या विमान सेवा बंद करण्याचा निर्णय़ घेतला आहे. इंडिगोने २९ एप्रिलपासून सप्टेंबर महिन्यापासूनच्या आपल्या सर्व लांब पल्ल्याच्या विमानांची तिकिटे विक्रीतून काढून घेतली आहेत. मँचेस्टर येथील विमानसेवा १ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार असून, लंडन हिथ्रो आणि ॲमस्टरडॅम येथील सेवा २७ ऑक्टोबर रोजी थांबविली आहे.

इतर विमानांच्या तिकिट दरात वाढ

विमान तिकिटे दोन महिने आधी आरक्षित केल्यास स्वस्तात तिकिटे मिळतात. परंतु इंडिगोने तिकिट विक्री बंद केल्याने २८ ऑक्टोबरचे मुंबई ते हिथ्रो विमानतळाचे तिकिट वाढले आहे.हीच परिस्थिती ॲमस्टरडॅम, मँचेस्टरची आहे.

मुंबई- हिथ्रो मार्गावरील तिकिट दर (२८ ऑक्टोबर)

विमान कंपनी—- तिकिट दर

व्हर्जिन अटलांटिक— १,०२,३७१ रु

एअर इंडिया—- ८६,८२९

कुवेत एअरवेज— ९९,४८३

एमिरट्स— ९१.२३६

लुफ्थान्सा— ८९,८२८

इंडिगोला सर्वात जास्त फटका

इंडिगोचे विमान सेवा गेल्या डिसेंबर महिन्यात तब्बल १० दिवस कोलमडली होती. त्यातच २८ फेब्रुवारी पासून इराण-अमेरिका युद्ध सुरु झाल्याने आंतरराष्ट्रीय मार्गावरील वाहतूकीचे तब्बल ४० दिवसापेक्षा जास्त तीनतेरा वाजले होते. संघर्षामुळे इंधन दर देखील वाढले आहेत. त्यामुळे इंडिगोला या पाच महिन्यात सर्वाधिक आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.