मुंबई :दिल्लीहून मँचेस्टरला जाणाऱ्या इंडिगो विमानाने जवळजवळ आठ तासांचा हवाई प्रवास केला. विमानाने संघर्षग्रस्त आखाती प्रदेशावरील हवाई मार्ग टाळून आफ्रिकेमार्गे प्रवास केला. परंतु एरिट्रियामधील हवाई वाहतूक नियंत्रणात गोंधळ झाल्याने विमानाला माघारी फिरावे लागले. यामुळे या विमानातील प्रवाशांचे हाल झाले.
इराण – इस्त्रायल युद्धामुळे आखाती देशांतील हवाई क्षेत्र २८ फेब्रुवारीपासून बंद आहे. अमेरिका, युरोपसह आखाती देशांतील विमान वाहतूक कोलमडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून इंडिगो आणि एअर इंडिया अमेरिका आणि युरोपकरिता काही विमाने चालवित आहे. इंडिगोने नॉर्वेजियन वाहक नॉर्स अटलांटिक एअरवेजकडून भाड्याने घेतलेल्या बोईंग ७८७ विमानाने सोमवारी (९ मार्च २०२६) रात्री १२.३० वाजता दिल्लीहून मँचेस्टर करीता उड्डाण केले. विमानाने संपूर्ण आखाती प्रदेशावरून प्रवास टाळला आणि इथिओपियामार्गे आफ्रिकेत प्रवेश केला. परंतु माघारी फिरून एरिट्रियावरून उड्डाण करत दिल्लीला परत आले. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विमान दिल्ली विमानतळावर उतरले.
इंडिगोची २६ फेब्रुवारीनंतर ९ मार्च रोजी मँचेस्टरला पहिलीच सेवा होती. प्रभावित हवाई क्षेत्र टाळण्यासाठी विमानाने आफ्रिकेवरून लांब मार्गाने प्रवास केला. आतापर्यंत, नॉर्सकडून भाड्याने घेतलेले बोईंग ७८७-८ विमान युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीच्या (ईएएसए) अधिकारक्षेत्रात येत असल्याने त्यांच्या सर्व युरोपियन सेवा बंद केल्या होत्या. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्राएल आणि इराणमधील हवाई हल्ल्यांनंतर पश्चिम आशियातील ११ देशांवरून उड्डाण करण्यास त्यांच्या विमान कंपन्यांना मनाई केली होती. विमानाच्या ऑपरेटिंग व्यवस्थेबद्दल गोंधळ निर्माण झाल्याने ते वळवण्यात आले.
नेमके झाले काय ?
ओव्हरफ्लाइट परवाना सामान्यतः मार्केटिंग कॅरियरद्वारे मिळवला जातो.इंडिगोने हा परवाना घेतला आहे, परंतु इंडिगोने विमान ज्याच्या नावाखाली नोंदणीकृत आहे त्या वाहकाची (नॉर्स) नोंदणी करणे आवश्यक आहे. जरी परवान्यामध्ये ही व्यवस्था दिसत असली तरी, एकाच विमानाशी जोडलेल्या दोन विमान कंपन्यांमुळे एरिट्रियामधील हवाई वाहतूक अधिकारी गोंधळले. त्यामुळे विमान माघारी वळवण्यात आले. रविवारी इंडिगोची मुंबई ते लंडन हीथ्रो विमानतळावरील विमानसेवा देखील याच कारणास्तव कैरो येथे वळवली होती.
प्रवाशांचे हाल
युरोप आणि आशियादरम्यानच्या विमानसेवेच्या सर्वात महत्त्वाच्या कॉरिडॉरपैकी एक मार्ग युद्धामुळे बंद आहे. परिणामी विमानांना लांब पल्ल्याच्या उड्डाणांचा धोका पत्करावा लागत आहे. वारंवार बदलणाऱ्या हवाई निर्बंधांमुळे विमान कंपन्यांना विमानांची वाहतूक करणे आव्हानात्कम झाले आहे. परंतु याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
