मुंबई : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची विमानसेवा गुरुवारीही विस्कळीत राहिली. दिल्ली, मुंबई, बंगळूरु आणि अन्य विमानतळांवरून ३००पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. मनुष्यबळाच्या अभावामुळे विमानतळावरील कामकाजात अडथळे येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले असून सलग तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या शहरांमध्ये इंडिगोच्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

विमानांची उड्डाणे रद्द होण्याबरोबरच वेगवेगळ्या विमानतळांवर विमानांच्या उड्डाणांना विलंबही झाला. इंडिगोची विमानसेवा वेळेच्या खात्रीशीरपणामुळे प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून प्रामुख्याने अपुरे मनुष्यबळ आणि वेळापत्रकात करावे लागणारे समायोजन यामुळे ही विमानसेवा विस्कळीत झाली आहे.

गुरुवारी दुपारपर्यंत इंडिगोची ३००पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली होती. दिल्ली विमानतळावर सर्वाधिक ९५ आणि त्याखालोखाल मुंबईतून ८५ विमानांचे उड्डाण रद्द करावे लागले. हैदराबादमध्ये ७० आणि बंगळूरुमध्ये ५० विमाने रद्द झाली. त्याशिवाय अन्य विमानतळांवरही उड्डाणे रद्द झाल्यामुळे सर्वत्र प्रवाशांची गर्दी, गोंधळ आणि मनस्ताप असे चित्र दिसले.

कामकाज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न

इंडिगोचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि वेळापत्रक सावरण्यासाठी आम्ही काम करत आहोत, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीटर एल्बर्स यांनी गुरुवारी सांगितले. मात्र हे लक्ष्य सोपे नाही, असे त्यांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात नमूद केले. प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे वचन पूर्ण करू शकलो नाही, अशी खंत त्यांनी त्यामध्ये व्यक्त केली आहे.

कंपनीला फटका

बुधवारी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळूरु आणि हैदराबाद या सहा महत्त्वाच्या विमानतळांची आकडेवारी विचारात घेऊन इंडिगोचा काढलेला वक्तशीरपणा (ऑन टाइम परफॉर्मन्स) १९.७ टक्क्यापर्यंत खाली घसरल्याचे सांगण्यात आले. तो मंगळवारी ३५ टक्के इतका होता. या सर्वांचा परिणाम म्हणून गुरुवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या समभागांमध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली.

आपल्या कंपनीचे आकारमान, व्याप्ती आणि गुंतागुंत पाहता या व्यत्ययांनी तातडीने मोठे रूप धारण केले आणि त्यामध्ये विविध पातळ्यांवर आणि प्रकारची उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी बरेच काम करावे लागणार आहे. सध्या येत्या काही दिवसांत कामकाज सुरळीत करणे आणि वेळेवर उड्डाण करणे याला प्राधान्य आहे. – पीटर एल्बर्स, ‘सीईओ’, इंडिगो