मुंबई : जागतिक बाजारपेठेत इंधन दरात वाढ झाल्याने इंडिगो विमानसेवा कंपनीने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवरील इंधन अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होत आहेत. देशांतर्गत मार्गांवर ३७५ रुपयांपासून ते १३०० रुपयांपर्यत व आंतरराष्ट्रीय मार्गावर १ ते ६ हजारांपर्यंत इंधन अधिभार लागू केला जात आहे. यामुळे दसरा-दिवाळी या सणांच्या काळात विमान प्रवासासाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

इंडिगोने यावर्षी तिसऱ्यांदा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील इंधन अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी विमान कंपनीने १४ मार्च व त्यानंतर १ एप्रिल रोजी भाडेवाढ केली होती. विमान इंधनाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे व या महिन्यात इंधन दरात १४ टक्यांपेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे खर्च गेल्या दशकातील सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे.

विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चात इंधन दराचा मोठा वाटा असल्याने, या दरवाढीचा परिणाम इंडिगोसह सर्व विमान कंपन्यांच्या खर्च रचनेवर होण्याची शक्यता आहे. ६ ऑक्टोबरपासून करण्यात येणाऱ्या सर्व नव्या तिकीट नोंदणीसाठी सुधारित शुल्क लागू होईल. काही महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर राहिल्या असून इराण-अमेरिका युद्धावर अद्याप तोडगा निघालेला नाही. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशननुसार, गेल्या १० वर्षांत इंधनाच्या किमती सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. सप्टेंबरमध्ये इंडिगोने लहान मुलांचे तिकीट २ हजार रुपयांवरून ३ हजार रुपये आणि अतिरिक्त सामानाचे शुल्क वाढवले. ऐन सणासुदीच्या दसरा, दिवाळी-छठ पूजा काळात ही वाढ झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

देशांतर्गत मार्गावर इंधन भार ० ते ५०० किमी: ३७५ रुपये ५०१ ते १,००० किमी: ६०० रुपये १,००१ ते १,५०० किमी: ९०० रुपये १,५०१ ते २,००० किमी: १,१५० रुपये २,००० किमी पेक्षा जास्त: १,३०० रुपये

आंतरराष्ट्रीय मार्ग

आंतरराष्ट्रीय मार्गांवर, सार्क प्रदेशातील उड्डाणांसाठी ५०० किमीपर्यंतच्या अंतरासाठी १ हजार रुपये व ५०० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी ३ हजार रुपये इंधन शुल्क आकारण्यात येणार आहे. आग्नेय आशिया, जीसीसी, पश्चिम आशिया उत्तर व पूर्व आशियासाठी ५,५०० रुपये, तर आफ्रिका व युरोपसाठी ६ हजार रुपये इंधन शुल्क आकारले जाणार आहे.