मुंबई : इंडिगो विमान कंपनीने नवी मुंबई विमानतळावरून सुरू केलेल्या हुबळी विमानसेवेचा गाशा गुंडाळून पुन्हा एकदा ही सेवा मुंबई विमानतळावरून सुरू करण्याची वेळ कंपनीवर आली आहे. मुंबई विमानतळाच्या तुलनेत प्रवासी संख्या निम्याने घटल्याने इंडिगोने नवी मुंबई ते हुबळी विमान सेवा बंद करून येत्या १ सप्टेंबरपासून जुन्या मुंबई ते हुबळी मार्गावर दैनंदिन विमान चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई ते हुबळी हवाई मार्ग हा इंडिगोच्या सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक होता. कंपनी या मार्गावर सातत्याने एअरबस ए-३२० विमान चालवत होती. एअरबसमध्ये आसन क्षमतेच्या ९० टक्यांपेक्षा जास्त प्रवासी क्षमता कायम होती. मात्र नवी मुंबई विमानतळावरून विमान चालविण्यास सुरुवात केल्यानंतर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या निम्म्याने कमी झाली. १८० आसनी विमानात ९० टक्यांपेक्षा जास्त प्रवासी संख्या नोंदवणाऱ्या इंडिगोला, नवी मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा अभाव आणि नवी मुंबई विमानतळ व मुंबई शहरामधील अंतरामुळे सरासरी ५० टक्के प्रवासी संख्या कमी झाली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानसेवा स्थलांतरित झाल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी वारंवार तक्रार करून मुंबईत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान, इंडिगोने १ जुलैपासून हुबळी-नवी मुंबई विमानसेवा आठवड्यातून पाच दिवसांपर्यंत कमी केली. तरीही प्रवाशांच्या संख्येत सुधारणा झाली नाही. त्यामुळे, इंडिगोने १ सप्टेंबरपासून मुंबई ते हुबळी दरम्यानची दैनंदिन विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगराला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रुपात दुसरे विमानतळ मिळाल्यानंतर अनेक विमान कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावरून विमानांची वाहतूक सुरू केली. मात्र पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे विमान कंपन्यांवर पुन्हा मुंबई विमानतळाकडे आपली वाहतूक वळविण्याची नामुष्की ओढावली आहे.

विमानाचे वेळापत्रक

मुंबईहून संध्याकाळी ६:०५ वाजता उड्डाण करून एअरबस संध्याकाळी ७:२५ वाजता हुबळीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी हुबळीहून रात्री ८ वाजता निघालेले विमान रात्री ९:२० वाजता मुंबईला पोहोचेल.

गैरसोय का?

सध्या नवी मुंबई विमानतळासाठी उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे उपलब्ध नाही. विमानतळावर जाण्यासाठी रस्ते प्रवासच मुख्य पर्याय उरतो. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाढतो, तसेच तेथील प्रवासावरही मर्यादा येतात. नवी मुंबई विमानतळाच्या आसपास प्रवाशांना राहण्यासाठी पुरेशा हॉटेल्स किंवा इतर सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना किंवा विमानतळावर वेळ घालवणाऱ्या पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. परिणामी, प्रवाशांसाठी जुने मुंबई विमानतळ अधिक सोयीचे आणि मध्यवर्ती आहे.