मुंबई : वाढता परिचालन खर्च, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे इंडिगोने ३१ ऑगस्टपासून दिल्ली, मुंबई-मँचेस्टर विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंडिगोने आपल्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील सहा ‘बोईंग ७८७-९ ड्रीमलायनर’ विमानांपैकी एक विमान नॉर्स अटलांटिक एअरवेजला परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडिगोने ३१ ऑगस्टपासून मँचेस्टरहून येणारी आणि जाणारी विमान सेवा तात्पुरती बंद करण्याची घोषणा मंगळवारी केली. भू-राजकीय तणाव आणि हवाई क्षेत्रावरील कडक निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मार्गांमध्ये सतत व्यतय येत आहे. हवाई मार्ग लांबल्याने परिचालन खर्चात वाढ झाल्याने विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानांच्या संख्येत कपात केली आहे.

विमानांच्या संख्येत कपात केल्याने मार्ग कमी झाले आहेत. परिणामी, भाडेतत्वावर घेतलेली विमाने परत करण्यात येत आहेत. इंडिगोने नॉर्स अटलांटिक एअरवेजकडून सहा वाइड-बॉडी बोईंग 787-9 ड्रीमलाइनर विमाने भाडेतत्वावर घेतली आहे. या विमानांच्या आधारे इंडिगोने यूके प्रदेशात विमान वाहतूक सुरू केली. इंडिगोने स्वतःची एअरबस ए३५० विमाने ताब्यात घेण्यापूर्वी युरोपमध्ये या बजेट एअरलाइनच्या ब्रँडची ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हे धोरणात्मक पाऊल उचलले होते. इंडिगोने नवीन एअरबस A321XLR विमानाने ॲमस्टरडॅम, अथेन्स आणि इस्तंबूलसाठी नवीन मार्गही सुरू केले. यापूर्वी मे महिन्यात, एअर इंडियानेही वाढत्या विमान इंधनाच्या किमतींमुळे आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये २७ टक्क्यांनी आणि नंतर देशांतर्गत सेवांमध्ये २२ टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली होती.

भारत आणि यूकेदरम्यान थेट, परवडणाऱ्या कनेक्टिव्हिटीसाठी प्रचंड मागणी आहे. तथापि, अस्थिर इंधन किमतींचा सामना करत असताना, मोठ्या वळणांच्या मार्गांवर वाइड-बॉडी विमाने चालवणे सध्या अवघड आहे.

मँचेस्टरसारख्या लांब पल्ल्याच्या ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी जलद करण्यासाठी मोठी विमाने अल्प कालावधीसाठी सेवेत दाखल केली होती. या सेवेला अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद होता. मात्र, हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे उड्डाणाचा वाढलेला वेळ आणि वाढीव खर्चामुळे मँचेस्टर सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. – अभिजित दासगुप्ता, वरिष्ठ उपाध्यक्ष, नेटवर्क प्लॅनिंग आणि रेव्हेन्यू मॅनेजमेंट, इंडिगो