मुंबई : मुंबई आणि गुजरातदरम्यान प्रवासाचा आणखी एक पर्याय मुंबईकरांना मिळणार आहे. येत्या २३ एप्रिलपासून इंडिगोने दररोज नवी मुंबई ते जामनगर विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवी मुंबईतून थेट जामनगरला प्रवाशांना विमानाने जाता येणार आहे

इंडिगो आधीच अहमदाबाद, वडोदरा, सुरत, राजकोट आणि भावनगर येथून विमान सेवा चालविते. नवी मुंबई ते जामनगर नवीन सेवा इंडिगोच्या ए ३२० विमानांद्वारे चालविण्यात येणार आहे. या विमान सेवेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढून व्यापार आणि पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे. नवी मुंबईहून दररोज दुपारी ४ वाजता निघून विमान ६ई-२०५३ जामनगरला संध्याकाळी साडेपाच वाजता पोहोचेल. तर परतीचे विमान ६ई-२०३४ संध्याकाळी ६.१० वाजता निघून नवी मुंबईला रात्री ७.३५ वाजता पोहोचणार आहे.

जामनगर हे गुजरातच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र आहे. ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, बंदरे आणि उत्पादन क्षेत्रात जामनगरचे मोठे योगदान आहे. नवीन विमान सेवा नवी मुंबईद्वारे प्रमुख आर्थिक केंद्रांशी शहराचे संबंध मजबूत करेल. यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि प्रादेशिक विकासासाठी नवीन संधी उपलब्ध होतील.