मुंबई : पश्चिम आशियातील मोठ्या विस्ताराला चालना देण्यासाठी इंडिगोने देशांतर्गत उड्डाणे १५ टक्क्यांनी कमी केली. इंडिगोने बंगळूरु, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता येथून होणाऱ्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात केली आहे. मुंबई, हैदराबाद आणि बंगळूरु यांसारख्या प्रमुख केंद्रांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढवली आहे.

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने, देशांतर्गत मागणीतील घट आणि वाढत्या परिचालन खर्चामुळे नेटवर्कची पुनर्रचना करताना, जून आणि जुलैपासून अनेक मेट्रो विमानतळांवरील देशांतर्गत क्षमता कमी केली आहे. विशेषतः आखाती आणि पश्चिम आशियाई ठिकाणांसाठी आंतरराष्ट्रीय सेवांचा विस्तार केला आहे.

प्रमुख महानगरांमध्ये हैदराबादमध्ये सर्वाधिक देशांतर्गत विमानसेवांमध्ये जवळपास १५-१७% घट अपेक्षित आहे. पूर्वीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत जून महिन्यात शहरात दररोजच्या ३०-३५ विमान फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. इंडिगोने सध्या आग्रा आणि कानपूरसाठीच्या विमानसेवा स्थगित केल्या आहेत, तर अयोध्यासारख्या मार्गांवरील फेऱ्यांमध्ये कपात केली आहे.

बंगळूरुहून दररोज सुमारे २८-३० देशांतर्गत विमान फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. एअरलाइनने अयोध्या आणि अगाट्टीसारख्या लहान ठिकाणांसाठीची कनेक्टिव्हिटी कायम ठेवली आहे. परंतु अहमदाबाद आणि कोलकातासह मोठ्या मुख्य मार्गांवरील फेऱ्या कमी केल्या आहेत. चेन्नई आणि कोलकाता येथेही नेटवर्कचे सुसूत्रीकरण होत असून, प्रत्येक विमानतळावरून दररोजच्या सुमारे १०-१५ विमान फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे.

चेन्नई-कोयंबतूर मार्गावर सर्वात मोठी कपात झाली असून कोलकाता आणि विशाखापट्टणमसाठीच्या विमान फेऱ्याही कमी झाल्या आहेत.कोलकाता आणि नवी मुंबईहून गोवा-मोपा आणि झारसुगुडा यांसारख्या ठिकाणांसाठीच्या काही थेट सेवा देखील तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय सेवांवर भर

देशांतर्गत विमानसेवा कमी करताना, इंडिगोने परदेशातील सेवांचा लक्षणीय विस्तार केला आहे. मुंबईतून, दुबई, अबू धाबी, बहरीन, दम्माम, दोहा, ढाका, मदिना, जेद्दाह आणि जकार्ता यांसारख्या ठिकाणांसाठी दररोज सुमारे आठ अतिरिक्त आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केल्या आहेत.

पावसाळ्यात देशांतर्गत मागणी कमी

जुलै ते सप्टेंबर दरम्यान देशांतर्गत मागणी कमी असल्याने विमान कंपन्यांना क्षमता सुमारे १० टक्यांनी कमी करावी लागते. तथापि, यावर्षी ही कपात नेहमीपेक्षा जास्त आहे. इंडिगोचे एकूण देशांतर्गत नेटवर्क १०-१५ टक्यांनी कमी झाले आहे.