मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशातल्या सहा शहरांमध्ये इंडिगो नव्याने विमानसेवा सुरु करणार आहे.येत्या २९ मार्च पासून ही सुविधा सुरु होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर अशा प्रमुख सहा शहरांसाठी नवी मुंबई विमानतळावरून विमाने उड्डाण करणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५पासून सेवा सुरू झाली आहे. सुरुवातीला देशातील काही मोजक्याच ठिकाणांसाठी नवी मुंबई विमानतळावरुन विमानसेवा पुरवली जात होती. आता देशातल्या आणखीन काही प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा विस्तारली जात आहे. या नविन सहा मार्गावर एटीआर विमानांचा वापर केला जाणार आहे. प्रादेशिक दळणवळण वाढवण्यावर भर दिला जात आहे.
या विमानांचे बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही. तिकिटे इंडिगो संकेतस्थळावर, मोबाईल ॲपवर आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईहून उड्डाणे वाढवणे हे त्यांच्या एटीआर नेटवर्कचा विस्तार करून पर्यटनाला चालना देण्याच्या, प्रादेशिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या आणि लहान शहरांपासून मोठ्या शहरांमध्ये जलद प्रवास सुलभ करण्यावर भर दिला आहे. यामुळे मुंबई विमानतळावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
दरम्यान, इंडिगोने फेब्रुवारी २०२६ च्या सुरुवातीला वाइड- बॉडी विमानांच्या ऑपरेशनवरील काही अडचणींमुळे लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. अनिश्चित काळासाठी कोपनहेगनला जाणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणे बंद केली आहे. दिल्ली- मँचेस्टर आणि दिल्ली- लंडन हीथ्रो मार्गावरील उड्डाणांची संख्या सुद्धा कमी केली आहे.
