Indira Jaising, Supriya Sule / मुंबई : महात्मा गांधीजी आणि डॉ. बाहासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने देशात स्त्री मुक्ती आणली. एकाने रस्त्यावर आंदोलन करायला शिकवले, तर दुसऱ्याने आपल्या मूलभूत अधिकारासाठी झगडायला शिकवले, असे प्रख्यात वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्या ॲड. इंदिरा जयसिंग यांनी सांगितले. आपल्या संविधानाचे जनक कोण असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण, आपल्या संविधानाच्या आई कोण असा प्रश्न कोणीच विचारत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्त्री मुक्ती चळवळीला ५० वर्ष पूर्ण होत असून यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. इंदिरा जयसिंग यांच्यासोबत डॉ. सईदा हमीद, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संघटनेच्या डॉ. छाया दातार, डॉ. प्रज्ञा दया पवार, ॲड.निशा शिऊरकर, डॉ. चयनिका शहा, लता भिसे-सोनावणे, हसीना खान आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेला महाराष्ट्रातील ३१ जिल्हयांतून ८०० हून अधिक महिला प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
एककाळ असा होता जेव्हा पाण्यासारख्या मुलभूत अधिकाराची समस्या सोडविण्यासाठी मृणालताई गोरे, अहिल्याबाई रांगणेकर यांना ‘लाटणे मोर्चा’ काढून रस्त्यावर उतरावे लागले. तर प्रमिला दंडवते यांनी हुंडाविरोधी चळवळ सुरू करून ती गावागावात पोहचविली. निरा देसाई यांनी शैक्षणिक परंपरेचा पुरस्कार केला तर निर्मला देशपांडे यांनी पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका आणि भारतातील महिलांच्या समस्या सारख्याच असल्याची जाणीव करून दिली.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून खा.सुप्रिया सुळे यांनी पाच दशकाच्या स्त्री मुक्ती चळवळीच्या आठवणींना थोडक्यात उजाळा दिला. स्त्री-पुरूष समानतेच्या वातावरणातच माझी वाढ झाली. आज राजकारणात स्त्रिया जरी मोठ्या प्रमाणात येत असल्या, सरपंच बनल्या तरी कारभार मात्र त्यांचे एसपी म्हणजेच सरपंच पतीच्या हातात असतो. हुंड्यामुळे आजही स्त्रिया आत्महत्या करीत आहेत. मेट्रो आल्या, परंतु प्रवास सुरक्षित नाही. शाळांमधून, घरांमधून स्त्रीला जेव्हा खऱ्या अर्थाने सन्मानाची वागणूक मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती होईल.
