मुंबई : गंगेच्या मैदानी प्रदेशात दरवर्षी तीव्र होत चाललेल्या उष्णतेच्या लाटा केवळ वाढत्या तापमानाचे लक्षण नसून, त्या मानवी आरोग्य, शेती आणि अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट ठरत आहेत. या उष्णतेच्या लाटा नेमक्या कशामुळे निर्माण होतात याबाबत दीर्घकाळ एक समज प्रचलित होता तो म्हणजे दूरवरून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे या लाटा तयार होतात. मात्र आता आयआयटी मुंबईच्या नव्या संशोधनाने या समजुतीला छेद देत उष्णतेच्या लाटांमागील ‘स्थानिक’ कारणांवर प्रकाश टाकला आहे. संशोधनामुळे आता या संकटाचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिक सूक्ष्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
या संशोधनानुसार, गंगेच्या मैदानी प्रदेशातील उष्णतेच्या लाटांच्या निर्मितीत स्थानिक जमीन आणि वातावरणीय घटक अधिक निर्णायक भूमिका बजावतात. म्हणजेच, उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि कालावधी हे केवळ बाहेरून येणाऱ्या गरम हवेवर अवलंबून नसून स्थानिक पातळीवरील बदलांवर अधिक अवलंबून असतात.संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, उष्णतेच्या लाटांच्या निर्मितीसाठी ‘अँटीसायक्लोन’ म्हणजेच उच्च दाबाची मोठ्या प्रमाणावरील प्रणाली आवश्यक असते. या प्रणालीमुळे हवा खाली दाबली जाते, ढग तयार होण्यास अडथळा निर्माण होतो आणि आकाश निरभ्र राहते. परिणामी सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडून तापमान झपाट्याने वाढते. मात्र, या प्रतिचक्रवातांची भूमिका केवळ पार्श्वभूमीपुरती मर्यादित असून, प्रत्यक्ष उष्णतेची लाट निर्माण होण्यासाठी स्थानिक घटक महत्त्वाचे ठरतात.
आयआयटी मुंबईच्या संशोधनात २०१० नंतरच्या १० प्रमुख उष्णतेच्या लाटांचे विश्लेषण करण्यात आले. ‘हीट-बजेट’ पद्धती आणि ‘इआरए ५’ हवामान डेटा यांच्या साहाय्याने तापमानातील बदलांचे विविध घटकांमध्ये विभाजन करण्यात आले. या अभ्यासातून असे दिसून आले की, जमिनीचे तापणे आणि हवेचे आकुंचन या दोन स्थानिक प्रक्रिया उष्णतेच्या लाटांच्या निर्मितीत प्रमुख भूमिका बजावतात. याशिवाय आर्द्रता, जमिनीतील ओलावा आणि ढगांची निर्मिती यांसारखे घटकही लाटांच्या स्वरूपावर प्रभाव टाकतात.
विशेष म्हणजे, संशोधनात उष्णतेच्या लाटांचे दोन वेगवेगळे प्रकारही स्पष्ट करण्यात आले आहेत.‘दमट’ व ‘शुष्क’ लाटा. दमट लाटांमध्ये उष्णतेबरोबरच वातावरणातील आर्द्रता अधिक असते. अशा परिस्थितीत मानवी शरीराला घामाद्वारे थंड होणे कठीण जाते, त्यामुळे या लाटा अधिक घातक ठरू शकतात. या लाटा सहसा मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनंतर निर्माण होतात, जेव्हा वातावरणात आर्द्रता वाढते आणि रात्री ढगांमुळे उष्णता अडकून राहते.याउलट, शुष्क उष्णतेच्या लाटा कोरड्या जमिनीवर आणि निरभ्र आकाशात तयार होतात. या लाटांमध्ये जमिनीचे तापणे हा मुख्य घटक असतो. अशा लाटा दीर्घकाळ टिकतात आणि मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर परिणाम करतात, त्यामुळे त्यांच्यामुळे मृत्यूचे प्रमाणही अधिक असू शकते.
संशोधकांच्या मते, सध्या भारतीय हवामानशास्त्र विभाग उष्णतेच्या लाटांची व्याख्या मुख्यत्वे तापमानाच्या आधारे करतो. मात्र, दमट आणि शुष्क लाटांमधील फरक विचारात घेतला जात नाही. या नव्या संशोधनामुळे उष्णतेच्या लाटांचे अधिक अचूक वर्गीकरण आणि अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे.या अभ्यासाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, उष्णतेच्या लाटांची पूर्वसूचना देण्यासाठी स्थानिक पातळीवरील संकेतांचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. जमिनीचे तापमान, आर्द्रता, मान्सूनपूर्व पावसाचे स्वरूप, आणि रात्री ढगांची उपस्थिती यांसारख्या घटकांचा सखोल अभ्यास केल्यास अधिक अचूक आणि स्थान-विशिष्ट इशारे देता येऊ शकतात.
संशोधकांनी पुढे ‘मशीन लर्निंग’ आधारित प्रणाली विकसित करण्याची योजना आखली आहे, जी या स्थानिक संकेतांच्या आधारे उष्णतेच्या लाटांची पूर्वसूचना देऊ शकेल. ही प्रणाली देशभरातील हवामान अंदाज अधिक सक्षम करण्यास मदत करू शकते. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटांची वारंवारता आणि तीव्रता वाढत असताना, या संशोधनाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. गंगेच्या मैदानी प्रदेशासारख्या घनदाट लोकवस्तीच्या भागात अशा अभ्यासांमुळे जीवितहानी कमी करण्यासाठी आणि योग्य वेळी उपाययोजना करण्यासाठी मोठी मदत होऊ शकते.आयआयटी मुंबईच्या या संशोधनाने उष्णतेच्या लाटांविषयीची पारंपरिक समज बदलून टाकली आहे. आता या संकटाचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिक सूक्ष्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
