मुंबई : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे कोरियन चित्रपट आणि सिरिज भारतीयांना भावल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गेटवे ऑफ इंडिया येथे ‘इंडो-कोरियन सांस्कृतिक महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने पर्यटन विभागाद्वारे विशेष उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली.
कोरिया प्रजासत्ताकाच्या वाणिज्य दूतावासाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर सदर बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र आणि कोरिया यांच्या सांस्कृतिक चळवळीचे प्रतीक हा महोत्सव ठरणार आहे. पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोश, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक. नीलेश गटणे पर्यटन विभागाचे उप सचिव. संतोष रोकडे आणि सांस्कृतिक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. गतवर्षी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘के-हार्मनी फेस्टा २०२५’ महोत्सवला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर यावर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन अधिक व्यापक स्वरुपात करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याच्या पर्यटन क्षेत्राचा विस्तार होण्याच्या दृष्टीने पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीत दक्षिण कोरीयाचे मुंबईतील उप-वाणिज्य दूत आणि सांस्कृतिक कार्य प्रमुख क्युंगबिओम किम यांनी प्रस्तावित महोत्सवाच्या रूपरेषेबाबत व नाविन्यपूर्ण संकल्पनांविषयी सविस्तर सादरीकरण केले. दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे, राज्याच्या पर्यटन क्षेत्राला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळावी हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे.
या आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या माध्यमातून कोरियन संस्कृती, पारंपारिक व आधुनिक संगीत, नृत्य, चित्रपट, खाद्यसंस्कृती आणि दोन्ही देशांतील सर्जनशील उद्योगांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा मानस आहे. बैठकीदरम्यान गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन करताना आवश्यक असणाऱ्या विविध प्रशासकीय परवानग्या, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि इतर स्थानिक प्राधिकरणांशी करायच्या समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करुन अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
पर्यटन विभाग आणि कोरिया प्रजासत्ताक वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव राज्याच्या पर्यटन वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास पर्यटन विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
