इंद्राणीनेच स्वाक्षरी करण्यास भाग पडल्याचा ‘सीबीआय’कडे दावा
शीना बोरा हिच्या वतीने ‘रिलायन्स मुंबई मेट्रो’ला सादर केलेल्या राजीनामा पत्रावर इंद्राणी मुखर्जी हिची स्वीय सचिव काजल शर्मा हिने स्वाक्षरी केली होती. इंद्राणीनेच आपल्याला शीनाच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी करण्यास आपल्यावर दबाव आणला होता, असा दावा काजल हिने ‘सीबीआय’कडे केला होता.
काजल ही इंद्राणीच्या मालकीच्या ‘आयएनएक्स’ या कंपनीत २००२-०७ या काळात नोकरी करत होती. नंतर २०११ पर्यंत ती इंद्राणीची स्वीय सचिव म्हणून पाहत होती. काजलने ‘सीबीआय’ला जो जबाब दिला आहे त्यात, मे २०१२ मध्ये इंद्राणीने तिला लंडनहून दूरध्वनी केल्याचे म्हटले आहे.
इंद्राणीने आपल्याला एक ई-मेल पाठवला. हा ई-मेल म्हणजे शीनाच्या वतीने रिलायन्सला पाठवण्यात येणारे राजीनामा पत्र होते. ई-मेल पाठवल्याचे सांगताना इंद्राणीने आपल्याला शीनाच्या स्वाक्षरीचा सराव करण्यास सांगितले. तसे करण्यास सुरुवातीला आपण नकार दिला आणि शीनाच्या खोटय़ा स्वाक्षरीची गरज काय अशी विचारणा इंद्राणीकडे केली होती. त्यावर शीना अमेरिकेत आहे व तिच्याजवळ सध्या इंटरनेट सेवा उपलब्ध नाही. मात्र तिने तात्काळ राजीनामा पाठवून द्यावा यासाठी तिच्या कार्यालयाकडून दबाव टाकण्यात येत आहे. त्यानंतर इंद्राणीचे ऐकण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळे आपण शीनाच्या स्वाक्षरीचा सराव केला आणि नंतर शीनाच्या राजीनाम्यावर तिची स्वाक्षरी करून ते रिलायन्सच्या कार्यालयात पाठवले, असेही काजलने ‘सीबीआय’ला सांगितले. एवढेच नव्हे, तर ऑगस्ट २०१२ मध्ये आपण शीनाच्या नावे ई-मेल उघडले आणि इंद्राणीने सांगितल्यानुसार त्यावरून भाडे रद्द केल्याचे कळवले होते, असेही काजलने सांगितले आहे. इंद्राणीचा माजी चालक आणि सध्या शीनाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला श्यामवर राय हा इंद्राणीचा खास माणूस होता. तो तिच्याकडे अनेक वर्षांपासून नोकरी करत होता. त्यामुळे प्रत्येक गोपनीय अगदी व्यक्तीगत कामही इंद्राणी त्याच्याकडून करून घेत असे. ‘आयएनएक्स’ तोटय़ात चालत होती म्हणून इंद्राणीने रायला एप्रिल २०१२ मध्ये नोकरी सोडायला सांगितले होते. त्याआधी मार्च २०१२ मध्ये तिने त्याचे ‘स्काईप’ अकाऊंटही उघडायला सांगितले होते. त्यानंतर जेव्हा त्या दोघांना स्काईपवरून बोलायचे असायचे त्या वेळेस तेथे कुणीही थांबत नसे. त्याला सव्वालाख रुपये देण्याचे आदेशही इंद्राणीने दिले होते.