मुंबई : आखाती युद्धामुळे तांबे आणि द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) यांची टंचाई निर्माण झाली असून त्यांचे दरही वाढले आहेत. परिणामी ‘दादर’च्या ‘इंदु मिल’मध्ये साकारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आतंरराष्ट्रीय स्मारकास फटका बसला असून हा प्रकल्प आणखी वर्षभर रखडण्याची शक्यता आहे.

प्रकल्पातील सहाय्यभूत इमारतींचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ३५० फूट पुतळा ज्यावर ठेवला जाईल, त्या १०० फूट पादपीठाच्या (पेडस्टल) आरसीसीचे काम चालू आहे. त्या पादपीठावर पुतळ्याचा सांगाडा उभा केला जाईल. सांगाड्याचे काम दमण, भिलाई, आणि नवी मुंबईत सुरु आहे. हा सांगाडा ६ हजार मे. टनाचा असून ४२७८ मे. टनाचे काम प्रकल्पस्थळी आले आहे. या सांगाड्यावर कास्य धातूचे पुतळ्याचे आवरण (स्कीन) असणार आहे.

दादरमध्ये ३०० आणि इतरत्र २०० कर्मचारी या प्रकल्पावर कार्यरत आहेत. पुतळ्याच्या कास्य धातूचे आवरण ८५० मे. टनाचे असून १०० मे. टनाचे आवरण दादरमध्ये आले आहे. यामध्ये पुतळ्याच्या दोन बूटाचा समावेश आहे. धातू ओतकामात एलपीजी वापरला जातो. आखाती युद्धामुळे तांबे आणि एलपीजीची देशात टंचाई असून दोन्हीचे दरही वाढले आहेत. त्याचा फटका पुतळ्याचे ओतकाम करणारे नोएडा येथील अनिल सुतार यांच्या कामास बसला आहे.

२०१८ मध्ये प्रकल्पाचा कार्यारंभ देण्यात आला. २५० फूटांचा पुतळा ३५० करणे, पुतळ्याच्या प्रतिकृतीस मान्यता घेणे आणि कोरोना काळातील टाळेबदी यामुळे प्रकल्प रेंगाळत गेला आहे. या पार्श्वभूमीवर स्मारकाचे बांधकाम करणाऱ्या ‘शापूरजी पालनजी’ कंपनीस नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत वाढवून दिली गेली आहे. प्रकल्पाचे आठ वर्षांमध्ये काम जेमतेम ५६ टक्के झाले आहे. त्यातच बांधकाम कंपनी आणि पुतळ्याचे ओतकाम करणारे कंत्राटदार दोहेही आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे १२.५ एकरावर असलेला १०८९ कोटी किंमतीचा प्रकल्प आणखी रेंगाळला आहे.

हाताचे आव्हान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या डाव्या हातात संविधान असून आणि उजवा हात वरती उंचावलेला आहे. उजवा हात ३२ मीटर लांब असून तर्जनीचा व्यास ६ फुटाचा आहे. प्रकल्पस्थळी समुद्री वारा आहे. त्यामुळे पुतळ्याचा तोल साधण्यासाठी स्टील सांगाड्यामध्ये अनेकदा बदल करावे लागल्याने बांधकाम कंपनीला मोठी कसरत करावी लागली.

बांधकाम कंपनी आणि पुतळ्याचे कंत्राटदार यांच्या काही आर्थिक अडचणी होत्या. प्रकल्पाचे प्राधिकरण असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( एमएमआरडीए) त्यांचे निराकरण केले आहे. वर्ष २०२८ मध्ये प्रकल्प पूर्ण होईल. – शशी प्रभू, प्रकल्प सल्लागार

आखाती युद्धामुळे तांबे व ‘एलपीजी’चे दर वाढले आहेत. उद्योगांमध्ये रोजगाराच्या अडचणी आल्याने ओतकाम करणारे कारागीर गावी गेले आहेत. पुतळ्याचे ५० फूट उंचीचे ओतकाम झाले असून नवी खेप लवकरच मुंबईला रवाना करत आहोत. – अनिल सुतार, मूर्तिकार