मुंबई : औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची तपासणी प्रमाणित वैद्यकिय व्यावसायिकाकडून करुन घेण्याची अट व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्यस्थिती संहिता २०२० नुसार अंतिम करण्यात आलेल्या नियमावलीतून काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता कंपनी मालकाला कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाकडून कामगारांची आरोग्य तपासणी करुन घेता येणार आहे. एकीकडे बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा सुळसुळाट झालेला असताना अशी मुभा घातक ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
येत्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील नियमावली अंतिम होण्याची शक्यता आहे. या नियमावलीत फक्त ४० वर्षांवरील कामगारांचीच तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याआधी सर्वच कामगारांची वैद्यकीय तपासणी केली जात होती. परंतु आता नव्या नियमावलीनुसार ४० वर्षांखालील कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक नाही. हेच धोकादायक असल्याकडे ‘असोसिएशन ऑफ ऑथराईज सर्टिफाईंग सर्जन्स आणि फॅक्टरी मेडिकल ऑफिसर्स’चे उपाध्यक्ष डॉ. अतुल बांड यांनी लक्ष वेधले आहे. वयाची कुठलीही अट न ठेवता सर्व कामगारांची वैद्यक तपासणी अनिवार्य करण्यात यावी आणि धोकादायक प्रक्रियेतील कामगारांची नियतकालिक तपासणी आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
औद्योगिक क्षेत्रातील ८० टक्के कामगार हे ४० वर्षांखालील आहेत. त्यामुळे वैद्यकीय तपासणी केवळ ४० वर्षांवरील कामगारांपुरती मर्यादित ठेवल्यास प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीपासून हा मोठा वर्ग वंचित राहणार आहे. चाळीशीनंतरच आजार सुरु होतात, असे नव्हे तर आजच्या कार्यस्थितीत मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, दृष्टिदोष, कुपोषण, स्नायू-अस्थिविकार, मानसिक आजार आदी अनेक समस्या तरुण कामगारांमध्येही आढळून येत आहेत. नियतकालिक तपासणीमुळे आजारांचे निदान योग्य वेळी होऊन उपचार सरु होऊ शकतात. त्यामुळे अनुपस्थिती आणि दीर्घकालिन अपंगत्व टाळली जाऊन उत्पादकता वाढू शकते, याकडेही डॉ. बांड यांनी लक्ष वेधले आहे. याशिवाय नव्या नियमावलीत कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाकडून तपासणी करुन घेण्याची मुभा धोकादायक आहे. या नियमावलीत केवळ प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिक असा उल्लेख आहे. पूर्वी या पात्रतेबरोबरच औद्योगिक आरोग्य या क्षेत्रातील प्रावीण्य आवश्यक होते. औद्योगिक वैद्यकीय तपासणीसाठी कार्यस्थळी असणारे धोके, आजार याचे विशेष ज्ञान असलेला वैद्यकीय व्यावसायिक याने तपासणी केली तर संबंधित कामगाराला फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्यात तपासणीसाठी जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची पात्रता नव्या नियमावलीत नमूद करण्यात आलेली नाही. वास्तविक कारखान्यातील वैद्यकीय अधिकारी हा विशेष व्यावसायिक आरोग्य प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. नव्या नियमावलीत ती काढून टाकण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
मूळ संहितेत पॅनेलवरील वैद्यकीय व्यावसायिकांकडून कामगारांची तपासणी करुन घेण्याची तरतूद नाही. पूर्वीच्या कायद्यात ती होती. तरीही नियमावलीच्या मसुद्यावर आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करुनच ती अंतिम केली जाईल – आय. ए. कुंदन, प्रधान सचिव (कामगार)
