मुंबई : मागील काही वर्षांपासून तरुण जोडप्यांमध्ये वंध्यत्त्वाचे प्रमाण वाढत आहे. उशिरा विवाह, बदललेली जीवनशैली, तणाव आणि हार्मोनल समस्या ही यामागील महत्त्वाची कारणे आहेत. मात्र वंध्यत्त्वाने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये शहरी भागातील रुग्णांचे प्रमाण तब्बल ९६.६ टक्के इतके आहे. यातही ३१ ते ३५ वयाेगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण ४६.६ टक्के इतके आहे.
वंध्यत्त्वाचे वाढते प्रमाण लक्षात घेत सरकारी रुग्णालयामध्ये सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान केंद्रे (एआरटी) सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेता कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अफिफा नौशाद व डॉ. राजश्री थातिकोंडा यांनी वंध्यत्वावरील उपचारासाठी येणाऱ्या राज्यातील एआरटी केंद्रांतील रुग्णांचा अभ्यास केला.
‘तृतीय स्तरावरील शासकीय रुग्णालयातील एआरटी केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या लोकसांख्यिकीय आणि नैदानिक माहितीचा अभ्यास’ या शीर्षकाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये राज्यातील विविध सरकारी रुग्णालयातील ६० रुग्णांचा समावेश करण्यात आला. या अभ्यासामध्ये समावेश केलेल्या रुग्णांपैकी ९६.६ टक्के रुग्ण हे शहरी भागातील, तर ग्रामीण भागातील प्रमाण हे ३.४ टक्के इतके असल्याचे आढळले. यामध्येही ३१ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४६.६ टक्के असल्याचे आढळले. त्याखालोखाल २६ ते ३० वयोगाटातील तरुणांचे प्रमाण २३.३ टक्के, ३६ ते ४० वयोगटातील जोडप्यांमध्ये हे प्रमाण १६.६ टक्के, तर ४० पेक्षा जास्त वयोगटातील जोडप्यांमध्ये हे प्रमाण १३.३ टक्के इतके आढळले. अभ्यासात प्राथमिक वंध्यत्वाचे प्रमाण ५१.६७ टक्के होते. हे प्रमाण दुय्यम वंध्यत्वापेक्षा अधिक असल्याचे आढळले. दुय्यम वंध्यत्वाचे प्रमाण ४८.३३ टक्के इतके आढळले. म्हणजेच अनेक दांपत्यांना कधीच गर्भधारणा झालेली नाही, हेही स्पष्ट झाले.
वंध्यत्वाची प्रमुख कारणे
उशिरा विवाह, बदललेली जीवनशैली, तणाव आणि हार्मोनल समस्या ही वंध्यत्वाचे प्रमाण वाढण्यामागील प्रमुख कारणे असली तरी कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये वंध्यत्वामागील प्रमुख कारण हे अंडवाहिन्याशी (फॅलोपियन ट्यूब्स) संबंधित नसून, अंडोत्सर्जनातील बिघाड किंवा हार्मोनल समस्या असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला. तपासणीमध्ये ७१.६ टक्के महिलांमध्ये अंडवाहिन्या सामान्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे वंध्यत्वामागील प्रमुख कारण ट्यूबशी संबंधित नसून, अंडोत्सर्जनातील बिघाड किंवा हार्मोनल समस्या असल्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आले.
उपचारात ‘ओव्ह्युलेशन इंडक्शन’ला प्राधान्य
उपचार पद्धतींमध्ये ५६ टक्के रुग्णांमध्ये ‘ओव्ह्युलेशन इंडक्शन’ (अंडोत्सर्जन प्रेरणा) हा सर्वाधिक वापरला जाणारा उपचार होता. त्यानंतर ३३ टक्के रुग्णांमध्ये आययूआय पद्धतीचा वापर करण्यात आला. महागड्या आयव्हीएफ उपचारांचा वापर तुलनेने कमी ८.३ टक्के करण्यात आला. या उपचारानंतर केवळ ८.३ टक्के रुग्णांमध्ये गर्भधारणा झाली. यामुळे उपचारानंतर यश येण्याचे प्रमाण हे मर्यादित असल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाले.
जागरुकतेअभावी उपचाराला विलंब
कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या या अभ्यासामाध्ये ४१.६ टक्के दाम्पत्य हे लग्नानंतर ५ ते १० वर्षांनी उपचारासाठी आल्याचे स्पष्ट झाले. २८ टक्क्यांहून अधिक दाम्पत्य ही १० वर्षांहून अधिक कालावधी उपचार घेत असल्याचे आढळले. तर ३० टक्के रुग्ण हे पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीपासून उपचार घेत आहेत. उपचारासाठी विलंब करण्यामागे समाजिक तणाव, आर्थिक समस्या आणि जागरुकतेचा अभाव असल्याचेही या संशोधनामध्ये उघडकी आले.
उशिरा विवाह, बदललेली जीवनशैली, तणाव आणि हार्मोनल समस्या यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दाम्पत्यांनी वेळेत तपासणी करून लवकर उपचार सुरू करणे आवश्यक आहे. – डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय
