scorecardresearch

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट? परदेशातून प्रशिक्षण घेऊन आलेला हस्तक शहरात; राष्ट्रीय तपास संस्थेकडून माहिती

चीन, हाँगहाँग, पाकिस्तान येथे प्रशिक्षण घेऊन आलेला हस्तक मुंबईत आल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना कळवण्यात आले आहे.

terrorist
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

मुंबई : चीन, हाँगहाँग, पाकिस्तान येथे प्रशिक्षण घेऊन आलेला हस्तक मुंबईत आल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना कळवण्यात आले आहे. एनआयएकडून रविवारी याबाबत ईमेल आला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.सरफराज मेमन हा संशयित मुंबईत पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे. एनआयए या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा मेल आला असल्याची सूत्रांनी माहिती दिली. सरफराज हा मध्य प्रदेशच्या इंदूरचा असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे मध्य प्रदेश पोलिसांनाही याबाबत कळवण्यात आले आहे. ही व्यक्ती भारतासाठी धोकादायक असून त्याची ओळख पटावी यासाठी त्याचा चालक परवाना, पारपत्र आधारकार्डची प्रत एनआयएकडून पोलिसांना ईमेलद्वारे पाठवलेली आहे. या संशयित व्यक्तीचा शोध सध्या सर्वत्र सुरू असून सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात एनआयएला मुंबईवर हल्ला करण्याच्या नियोजनाबाबत ईमेल मिळाला होता. तपासणीत तो पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले. ई-मेलमध्ये सीआयएचा अधिकारी असल्याचे भासवण्यात आले आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला होणार असल्याचा संदेश आला होता. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश मिळाला होता. सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सांताक्रुझ येथील एका व्यक्तीला घातपाताच्या धमकीचा व्हिडिओ कॉल आला होता. अशा घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण येत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 00:19 IST