मुंबई : गोकुळाष्टमीच्या दिवशी घाटकोपर येथे दहिहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थरावरून कोसळून गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंतसाठी मदतीच्या घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्षात अद्यापही त्याला आर्थिक मदत मिळालेली नाही. मानेला गंभीर दुखापत झाल्यामुळे प्रथमेश जायबंदी अवस्थेत केईएम रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसैनिकांनी केईएम रुग्णालयात जाऊन त्याची विचारपूस केली. यावेळी पेडणेकर यांनी सरकारवरही टीका केली.

हेही वाचा >>> अभिनेता अरमान कोहलीला अखेर जामीन; अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक

हेही वाचा >>> मुंबईत लेप्टोचा धोका वाढतोय; आठवड्याभरात नऊ नवीन रुग्ण

गोकुळाष्टमीच्या घाटकोपर येथे गोविंदा पथकासह गेलेल्या प्रथमेश थरावरून पडला आणि गंभीर जखमी झाला. करीरोडमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रथमेशच्या मानेला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेला महिनाभर प्रथमेश रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या मानेला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या शरीराची हालचाल होऊ शकत नाही. प्रथमेश गरीब कुटुंबातील मुलगा असून त्याचे आई-वडील नाहीत. तो काकांच्या कुटुंबासोबत राहतो. घरोघरी जेवणाचे डबे पोहोचवून कुटुंबालाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावणारा प्रथमेश अंथरूणाला खिळला असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन प्रथमेशची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सचिन पडवळ, सिंधू मसूरकर आणि शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा >>> वसतिगृहाच्या शौचालयात डोकावणाऱ्याला अटक

दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी शिंदे सरकारवर टीका केली. शिंदे सरकारने लोकांना खूष करण्यासाठी दहीहंडी उत्सवावरील निर्बंध हटवले होते. त्यामुळे गेल्या सहा-सात वर्षांपासून दहिहंडीला लागलेली शिस्त यावेळी मोडली. सराव न करता अनेक गोविंदांनी थर रचले. त्यामुळे या दुर्घटना घडल्या. ज्या गोविंदांचा अकाली मृत्यू होतो, त्याच्या कुटुंबियांचे जगणे मुश्कील होते. त्यामुळे सरकारने घोषणा करताना भान ठेवायला हवे, असेही त्या म्हणाल्या. सरकारने त्यावेळी गंभीर जखमींना सात लाख रुपये तर मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रथमेशला गंभीर दुखापत होऊनही त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळालेली नाही. इतकेच नाही, तर त्याची साधी विचारपूस करण्यासाठीही कोणी रुग्णालयात गेलेले नाही, अशी टीका पेडणेकर यांनी केली. ‘हाफकीन कोण होता’ असे विचारून बौद्धीक दिवाळखोरीचे दर्शन घडविणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी जरा इथे लक्ष द्यावे, असाही टोला त्यांनी हाणला आहे.