साठेबाजीप्रकरणी औषध कंपनीच्या संचालकाची चौकशी

भाजप नेते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

फडणवीस पोलीस ठाण्यात

मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका औषध कंपनीच्या संचालकाला शनिवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच कंपनीच्या संचालकाला सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबई पोलिसांच्या झोन ८ कार्यालयात दाखल झाले. या प्रकरणावरून रविवारी दिवसभर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

दमण येथील ब्रूक फार्मा या औषध उत्पादक कंपनीकडे ६० हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ब्रूक फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकनिया यांना त्यांच्या कांदिवलीतील निवासस्थानावरून ताब्यात घेतले. हा साठा परदेशात निर्यात केला जाणार होता. मात्र भारत सरकारने निर्यातीवर बंदी घातल्याने तो पडून होता. सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठय़ा प्रमाणात तुडवडा आहे. अपुऱ्या पुरवठय़ामुळे सर्वसामान्यांना हे औषध मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या औषधाचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमी वर रेमडेसिविरच्या ६० हजार इंजेक्शनचा साठा केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी डोकनिया यांची चौकशी सुरू केली होती. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकही चौकशीसाठी बीकेसी पोलीस ठाण्यात हजर होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

डोकनिया यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सर्वप्रथम विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल झाले. डोकनिया यांना पोलीस बीकेसी पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याची माहिती  मिळताच फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड आणि कार्यकर्त्यांसह बीकेसी पोलीस ठाण्यात गेले.

भाजप नेते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. चौकशीनंतर शनिवारी मध्यरात्री डोकनिया यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलीस प्रवक्ते  चैतन्या एस. यांनी दिली. परंतु डोकनिया यांना गरजेनुसार पोलीस बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. डोकनिया यांनी रेमडेसिविरचा साठा का केला होता, याची चौकशी सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

राजकीय सूडबुद्धीने कारवाई : फडणवीस

पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकांना घरातून ताब्यात घेतल्याचे समजल्यानेच आम्ही पोलिसांकडे गेलो.  या निर्यातदारांशी भाजपनेत्यांनी दमणमध्ये संपर्क साधून निर्यात बंदीमुळे शिल्लक साठा महाराष्ट्रासाठी देण्याची विनंती केली होती व त्यांनी संमतीही दिली होती. त्यासाठी आवश्यक केंद्र व राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कायदेशीर परवानग्या मिळविल्या. त्यासाठी मी केंद्रीय मंत्र्यांशीही बोललो होतो. तरीही घरी १०-११ पोलीस पाठवून या व्यावसायिकास का बोलाविण्यात आले, असा सवाल करीत एका मंत्र्याच्या विशेष कार्य अधिकाऱ्याने या व्यावसायिकाला दुपारी दूरध्वनी करून धमकी दिली व ते ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी रात्री ही कारवाई केली. राजकीय हेतूंनी सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांना एवढा पुळका का : नवाब मलिक

ब्रुक फार्माच्या राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी बोलाविल्यानंतर भाजप नेते का घाबरले, भाजप नेत्यांनी या व्यावसायिकाचे वकीलपत्र घेतले आहे का, त्यांना सोडवायला विरोधी पक्षनेते व भाजप आमदार स्वत: का गेले, दूरध्वनीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होऊ शकत होती. त्यामुळे भाजपने याचा खुलासा करावा, अशी मागणी अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी के ली. फडणवीस यांना या कं पनीचा एवढा पुळका का आला, असा सवालही त्यांनी के ला. रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे. आम्हाला विकण्याची परवानगी द्या, यासाठी राज्य सरकारकडे मागणी करीत आहेत. ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न आणि औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भेटले होते. निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा आहे, त्या आधारे  डोकानिया यांना बोलावून माहिती गोळी केली जात होती. राजेश डोकानीया यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले आहे.  तुम्ही ट्वीट करुन ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा आम्ही वाटणार आहे, असे सांगता. पण सरकार मागते, तेव्हा हे व्यावसायिक देत नाहीत. मग यामागे काय राजकारण आहे? हे भाजपने स्पष्ट केले पाहिजे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचीही टीका

एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या फडणवीस आणि दरेकर या विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. रेमडेसिविरच्या ६० हजार इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांनी लपविला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरूनच त्यांची चौकशी करण्यात आली. रेमडेसिविरचा तुटवडा असताना फडणवीस, दरेकर यांना व्यावसायिकांचे हित महत्वाचे वाटते, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.

 शासकीय कामकाजात हस्तक्षेपच – गृहमंत्री

रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्यानेच पोलिसांनी औषध कं पनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलाविले होते. पोलिसांवर दबाव टाकणे हा शासकीय कामकाजात हस्तक्षेपच समजला जातो. यामुळे फडणवीस व दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा का, याची चौकशी करण्यात येत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Inquiry into the director of a pharmaceutical company in a hoarding case akp