मुंबई : येलोगेट पोलिसांनी पी ३०५ बार्जवर (तराफा) मुख्य अभियंता म्हणून कार्यरत रेहमान शेख यांच्याकडे गुरुवारी चौकशी केली. चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळाल्यापासून बार्ज बुडेपर्यंतचा घटनाक्रम पोलिसांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नौदलाने समुद्रातून सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणलेले शेख ताडदेव येथील अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुरुवारी पोलीस उपायुक्त (बंदर) गणेश शिंदे, येलो गेट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. शेख यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वादळाची पूर्वसूचना इतरांप्रमाणे पी ३०५ लाही मिळाली होती. आसपासच्या सर्व बोटी वेळीच किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्या. मात्र पी ३०५चे भर समुद्रात होती. शेख यांनी पी ३०५ च्या कप्तानास माघारी वळण्याबाबत विचारणा केली. तेव्हा कप्तानाने वादळ तास, दोन तास राहील. वारा ४० सागरी मैलांपेक्षा अधिक नसेल, असे सांगितले.

प्रत्यक्षात वारा ताशी १०० सागरी मैलांहून अधिक वेगाने वाहू लागला. त्यामुळे पाच नांगर तुटल्याने पी ३०५ तेल फलाटास आदळली. सर्व जीवरक्षक बोटींकडे वळले. मात्र त्यातील १४ बोटी फुटलेल्या होत्या. समुद्रात त्यांचा काहीही उपयोग होणार नव्हता. वारा, लाटांमुळे अन्य दिशेला असलेल्या जीवरक्षक बोटींकडे जाणे अशक्य होते. परिसस्थिती लक्षात घेता अधिकारी, कामगारांना तरंगण्यासाठी उपयोगी पडणारी साधने देऊन समूहाने समुद्रात उडी मारण्यास सांगण्यात आले. त्यानुसार सर्वांनी उड्या मारल्या, असे शेख यांनी सांगितले.

‘पी ३०५’ ची जबाबदारी आमची नाही’

तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्रात बुडालेला ‘पी ३०५’ हा  तराफा डुमॅस्ट या कंपनीचा असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्यांचीच आहे. त्याचबरोबर या तराफ्यावरील नाविक किंवा खलाशी हे डुमॅस्ट कंपनीचे कर्मचारी होते, असे अफकॉन या कंपनीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

चक्रीवादळाबाबत १४ मे रोजी सूचना मिळाली होती. दिलेल्या अंदाजानुसार वाऱ्याचा वेग जास्तीत जास्त ४० नॉट अपेक्षित होता. त्यानुसार सर्व जहाजांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले होते. ‘पी ३०५’ सह अन्य जहाजेही सुरक्षित ठिकाणी गेली होती. समुद्रात कार्य सुरू असलेल्या एचटी फलाटापासून ‘पी ३०५’ या तराफेच्या कप्तानने तराफा २०० मैल दूर हलविला होता. ती जागा सुरक्षित असल्याचे पाहून तराफा नांगर टाकून उभा करण्यात आला. दुर्दैवाने १६ मे रोजी वातावरण झपाट्याने बदलले. १७ मे रोजी वातावरणात आणखी बदल झाले. त्यामुळे  कप्तानाला निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, असेही अफकॉनने नमूद केले आहे.