नौदलाच्या आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला झालेल्या दुर्घटनेला सोमवारी दोन महिने पूर्ण होत असून या दुर्घटनेत तीन नौदल अधिकाऱ्यांसह १८ नौसैनिक मृत्युमुखी पडले. परंतु त्यापैकी सात नौसैनिकांचा अद्याप पत्ता लागलेला नाहीत. या दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल एक महिन्यात सादर होणार होता. परंतु त्याबाबत नौदलाने मौन बाळगले आहे.
नौदलाच्या आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीवर १४ ऑगस्ट २०१३ च्या मध्यरात्री स्फोट झाले होते. त्यावेळी पाणुबडीवरतीन नौदल अधिकारी आणि १५ नौसैनिक होते. स्फोटामुळे लागलेल्या आगीत हे नौसैनिक ठार झाले होते. पाणबुडी बाहेर काढण्याचे सुरू नौदलाचे काम अद्यापही सुरू आहे. आतापर्यंत दुर्घटनेतील १८ पैकी ११ नौसैनिकांचे मृतदेह सापडले आहेत. त्या ११ पैकी नऊ जणांची ओळख डीएनए चाचणीच्या माध्यमातून पटविण्यात आली होती. पंरतु अद्याप सात नौसैनिक बेपत्ताच आहेत. ते सापडण्याची शक्यता धूसर बनल्याचे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नौदलाने अद्याप त्यांना मृत घोषित केलेले नाही.
या दुर्घटनेचा चौकशी अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे आदेश नौदल प्रमुखांनी दिले होते. पंरतु त्या अहवालाबाबतखुद्द नौदल मौन बाळगून आहे. अहवाल सादर झाला की नाही त्याबाबत आता सांगता येणार नाही, असे नौदलाचे प्रवक्ते नरेंद्र विस्पुते यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत पोलिसांनी केवळ अपघाती मृत्यूची नोंद केली असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले. अद्याप नौदलाचा चौकशी अहवालही प्राप्त झाला नसल्याचेही ते म्हणाले.