नौदलाच्या १८ नौसैनिकांना घेऊन रसातळाला गेलेल्या ‘सिंधुरक्षक’ पाणबुडीत सोमवारी सातवा मृतदेह सापडला. नौदलाच्या पाणबुडय़ांना या पाणबुडीत प्रवेश करण्यात यश आले असले, तरी समुद्रतळातील चिखल आणि पाणी पाणबुडीत शिरल्याने शोधकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. हा मृतदेह सापडल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर गेली आहे. मात्र अद्यापही ११ जणांचा पत्ता लागलेला नाही. हा सातवा मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती नौदलाने दिली.
‘सिंधुरक्षक’वर झालेल्या स्फोटांमुळे आणि त्यानंतर लागलेल्या आगीमुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते. या प्रलयंकारी आगीने पाणबुडीच्या अंतर्गत भागाची रचना पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. अनेक भाग वितळल्याने आतील दृष्य अत्यंत भेसूर आहे. त्यातच समुद्राचे पाणी आणि चिखल पाणबुडीत शिरल्याने भलेमोठे प्रकाशझोत सोडूनही आत काही दिसण्यात अडथळे निर्माण होत आहेत. तरीही नौदलाचे पाणबुडे आणि व्यावसायिक कंपन्यांचे पाणबुडे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. नौदलाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १८ नौसैनिकांच्या नातेवाईकांच्या रक्तांचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. हे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्याशिवाय नौदलाने या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमली असून ही समिती येत्या चार आठवडय़ांत आपला अहवाल सादर करणार आहे. मुंबई पोलिसांनीही याबाबत अपघाती मृत्यूंचा गुन्हा दाखल केला आहे. नौदलाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दुर्घटना घडून आता आठवडा उलटत आला असला, तरी अद्याप सर्व नौसैनिकांचा थांगपत्ता लागलेला नाही.