नौदलाच्या सिंधुरक्षक पाणबुडीला आग लागल्यामुळे जलसमाधी मिळून २४ तास उलटल्यानंतरही अद्याप त्यामध्ये असलेल्या १८ नौसैनिकांचे नेमके काय झाले, हे स्पष्ट झालेले नाही. पाणबुडीमध्ये अडकलेल्या नौसैनिकांना बाहेर काढण्यासाठी नौदलाचे जीवरक्षक खलाशी बुधवार सकाळपासून समुद्राच्या तळाशी पाणबुडीमध्ये शोध घेताहेत. मात्र, आगीमुळे पाणीबुडीच्या आतील भाग वितळल्यामुळे त्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन शोध घेणे अवघड बनले आहे.
पाणबुडीच्या आतील भागातील दृश्यताही खूप कमी झाली आहे. त्यामुळे जीवरक्षकांच्या कार्यात सातत्याने अडथळे येताहेत. पाणीबुडीच्या आतमध्ये असलेल्या कोणत्याही नौसैनिकाचा अद्याप शोध लागलेला नाही किंवा कोणालाही बाहेर काढण्यात आलेले नाही, असे नौदलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आगीमुळे पाणबुडीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. त्यातच आगीच्या उष्णतेने आतील बराचसा भाग वितळला आहे. त्यामुळे आतील साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले आहे. पाणबुडीच्या अंतर्गत भागातील विविध कप्प्यांमध्ये पोहोचणेदेखील अवघड बनले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
पाणीबुडीच्या आतील पाणी बाहेर काढण्यासाठी मोठ्या अश्वशक्तीचे पंप्स वापरण्यात येत आहेत, असेही नौदलाने स्पष्ट केले.
मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये मंगळवारी मध्यरात्री आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला स्फोटामुळे आग लागली. नौदलाच्या आणि मुंबई महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या साह्याने दोन ते तीन तासांत ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, आगीमुळे पाणबुडीमध्ये पाणी शिरल्याने तिला जलसमाधी मिळाली. घटना घडली त्यावेळी पाणबुडीमध्ये तीन अधिकारी आणि १५ नौसैनिक कार्यरत होते. या १८ जणांचा शोध घेण्याचे काम बुधवारी सकाळपासून युद्धपातळीवर सुरू आहे. स्फोटाची आणि आगीची चौकशी करण्यासाठी नौदलाने वेगवेगळ्या तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमली आहे.