scorecardresearch

INS Vikrant Fund Case: किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अटकेपासून संरक्षण देताना सांगितलं “तक्रार अस्पष्ट आणि…”

हायकोर्टाची किरीट सोमय्यांना पोलिसांसमोर हजर राहण्याची सूचना

आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणामुळे सध्या अडचणीत असलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. किरीट सोमय्यांना यांना हायकोर्टाने अटकेपासून दिलासा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचा दावा करत सोमय्या यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. गुरुवारपासून सलग आलेल्या सार्वजनिक सुट्टय़ांमुळे याचिका बुधवारीच सुनावणीसाठी यावी यासाठी किरीट यांच्यातर्फे प्रयत्न केले जात होते.

हायकोर्टाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून दिलासा देताना तक्रार अस्पष्ट आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारलेली असल्याचं निरीक्षण नोंदवलं. यावेळी कोर्टाने किरीट सोमय्यांना चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावं लागणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

५७ कोटी जमवल्याचा आरोप तक्रारदाराने कशाच्या आधारे केला याबाबतही तक्रारीत कुठेच उल्लेख नाही असं कोर्टाने यावेळी सांगितलं. १८ एप्रिलपासून पुढील चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश यावेळी कोर्टाने दिले. तसंच अटक झाल्यास ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोमय्या यांचा मुलगा नील याचाही अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. आयएनएस ‘विक्रांत’ला भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी सोमय्या यांनी निधी गोळा केल्याचे, परंतु ते राज्यपालांच्या कार्यालयात जमा केले नसल्याचे पुराव्यांतून स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सोमवारी फेटाळला होता.

दरम्यान सोमय्यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही सोमय्या यांचे ५ पानांचा जबाब दिला असल्याची माहिती दिली. “९ एप्रिलला समन्स आला होता त्याचवेळी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येणार नसल्याचे कळवले होते. अशातच आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स आले. आम्ही सोमय्या यांचा पाच पानांचा जबाब दिला आहे. आम्ही सर्व पुरावे ट्विट, राज्यपालांच्या भेटीबाबतची कागदपत्रे दिली आहे. आम्ही १३ तारखेनंतर येऊ असे कळवले आहे”. शिवसेनेच्या दबावातून हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

सोमय्या पिता-पुत्रांना आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स

किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले असून १३ एप्रिलला तपासासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याप्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे. नुकतेच हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी शोध मोहीम राबवली.

आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुह्यातील रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी दोघांनाही समन्स बजावले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक सोमय्या यांच्या घरी गेले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ins vikrant fund case bjp kirit somaiya gets relief from mumbai high court sgy

ताज्या बातम्या