scorecardresearch

किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार; ५७ कोटींच्या INS विक्रांत प्रकरणी FIR दाखल

अनेक कंपन्यांकडून सोमय्यांनी विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी गोळा केल्याचा आरोप करण्यात आलाय.

kirit somaiya FIR
ट्रॉम्बे पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आली तक्रार (फाइल फोटो)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं चित्र दिसत आहे. या प्रकरणामध्ये ट्रॉम्बे पोलीस स्थानकामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. वर्गणीच्या माध्यमातून ५७ कोटी गोळा करुन ते सोमय्या यांनी आपल्या उद्योगासाठी वापरल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नक्की वाचा >> संजय राऊतांनी पोस्ट केला किरीट सोमय्यांचा फोटो; एकेरी उल्लेख करत म्हणाले, “सोमय्या महाराष्ट्रद्रोही तर होताच पण…”

बुधवारी सायंकाळी कलम ४२० म्हणजेच फसवणुकीच्या गुन्ह्याखाली किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा नील सोमय्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय. निवृत्त सैनिक असणाऱ्या बबन भोसले यांनी या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. ट्रॉम्बे पोलीस स्थानकामध्ये किरीट सोमय्या आणि नील सोमय्याविरोधात एफआयआर दाखल करुन घेत पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केलाय.

आरोप काय ?
किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करावी अशी मागणी संजय राऊत यांनी बुधवारी केली. “किरीट सोमय्या विक्रांत वाचवा असे टी शर्ट घालून फिरत असताना लाखो, करोडो लोकांनी त्यांना पैसे दिले. याशिवाय अनेक कंपन्यांकडून त्यांनी विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी गोळा केले. ही रक्कम ५७ ते ५८ कोटी होती अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

“महात्मा किरीट सोमय्या यांच्या मुलाखती मी वाचल्या. यावर त्यांनी या सरकारला देशभक्ती नाही असं म्हटलं होतं. २०० कोटी गोळा करणार असून ते राजभवनात जमा करु असं त्यांनी सांगितलं होतं. माझ्याकडे राज्यपाल कार्यालयातून आलेलं पत्र आहे. आरटीआय कार्यकर्त्याने राज्यपालांना २०१३, २०१४, २०१५ विक्रांतसाठी जे पैसे गोळा केले होते ते जमा झालेत का? अशी विचारणा केली. यावर राज्यपाल कार्यालयाने असे कोणतेही पैसे जमा करण्यात आलेले नाहीत असं उत्तर देण्यात आलं. देशाच्या सुरक्षेशी, राष्ट्रीय भानवेशी केलेली ही फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केली आहे.

“देशद्रोही किरीट सोमय्यांनी ५७ कोटी जमा केले. पण हा आकडा १०० कोटींच्या वर असावा असं मला वाटतं,” असं राऊत म्हणाले. आता आपल्याला तर काही समजलं नाही असं ते म्हणतील सांगत संजय राऊतांनी फोटो दाखवले. “आम्ही चर्चगेट स्टेशनला त्या डब्यात ५ हजार टाकल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. ही रक्कम कुठे गेली? कोणाच्या घशात गेली? ही रक्कम भाजपाने निवडणुकीत वापरली की किरीट सोमय्यांची कंस्ट्रक्शन कंपनीत वापरले?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

“हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली गोळा केलेले पैसे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी चौकशी केलीच पाहिजे, पण केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर सीबीआय, इन्कम टॅक्स आणि भाजपाची पदाधिकारी असणारी ईडी यांनी चौकशी करावी. त्यांना काही सापडत नसेल तर मी मदत करेन,” असं संजय राऊतांनी सांगितलं. यात अनेक लोक आहेत पण सोमय्या या भ्रष्टाचाराच्या कटाचे सूत्रधार आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला.

सोमय्यांचं उत्तर…
संजय राऊतांनी केलेल्या आरोपाला किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊतांच्या आरोपांनंतर किरीट सोमय्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले की, “हा १८ वा आरोप आहे, १७ आरोप बोगस निघाले. उद्धव ठाकरे पण काही करू शकले नाहीत. हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने पण थोबाडीत दिली. मी तर पहिल्यापासून सांगत आहे की मी, नील सोमय्या आणि मेधा सोमय्या यांनी काही घोटाळा केला असेल तर उद्वव ठाकरेंकडे कागदपत्रं द्या, तपास करा आणि शिक्षा द्या.”

पुढे ते म्हणाले की, “काही काही घोटाळा केलेला नाही. मी संजय राऊतांना मी आव्हान देतो की, घोटाळा केला असेल तर उद्धव ठाकरे यांना सांगा आणि कारवाई करा. पण संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जी कारवाई झाली, संपत्ती जप्त झाली त्यामुळे त्यांना पुढच्या कारवाईची भीती वाटते”.

“काल भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाने संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या आणखी एका बोगस कंपनीच्या विरोधात सेशन्स कोर्ट आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. सुजित पाटकर यांनी इंटरनल हेल्थकेअर नावाची बोगस कंपनी बनवली. जानेवारी २०२१ मध्ये कंपनी बनवली, एप्रिलमध्ये मोठे कोविड सेंटर चालवायचे टेंडर भरले त्याचा पण तपास होणार,” असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ins virat scam case fir against kirit somaiya and his son for alleged rs 57 cr scam scsg

ताज्या बातम्या