मुंबई : पावसाळा जवळ येत असून सध्या मुंबईत ठिकठिकाणी पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून या कामांची नियमित पाहणी करण्याचे आदेश मुंबई उपनगर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष आणि अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांना दिले.
पालिका मुख्यालयात मंगळवारी पावसाळापूर्व समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अश्विनी भिडे आणि मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. बैठकीस अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू, मुंबई उपनगर जिल्ह्याधिकारी निधी चौधरी, पालिकेचे सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख आणि विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा, पाऊस सुरू असताना वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू राहावी, झाड उन्मळून पडल्यास तातडीने उपाययोजना करावी, तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मुंबईमधील धोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धोकादायक इमारतींबाबतची कार्यवाही पावसाळय़ापूर्वीच पूर्ण करावी, असे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे संचालक महेश नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. मुंबईत पडलेला पाऊस, रेल्वेसह विविध वाहतूक सुविधांची माहिती, अपघात, झाडे पडणे आदींबाबतची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
मुंबईत पर्जन्य जलवाहिनी खात्याची सुरू असलेली कामे, आरोग्य विभाग, कीटक नियंत्रण विभाग, प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये, उद्यान खाते आदींच्या कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अखेरीस संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी ‘पंतप्रधान स्वनिधी योजने’बाबत माहिती दिली.
यंदा १६ जून, १५ जुलैला सर्वाधिक उंच लाटा
यंदा १६ जून, १५ जुलै रोजी सर्वात उंच लाटा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या दिवशी लाटांची उंची ४.८७ मीटर असेल. तसेच १५ जून रोजी ४.८६ मीटर, १६ जुलै रोजी ४.८५ मीटर, १३ ऑगस्ट रोजी ४.८५ मीटर उंचीच्या लाटा समुद्रकिनाऱ्यावर उसळतील. त्यामुळे नागरिकांनी या दिवशी विशेष काळजी घ्यावी. किनाऱ्यावर लाटा धडकत असताना तेथे जाऊ नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. यंदा १६ जून, १५ जुलैला सर्वाधिक उंच लाटा
यंदा १६ जून, १५ जुलै रोजी सर्वात उंच लाटा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या दिवशी लाटांची उंची ४.८७ मीटर असेल. तसेच १५ जून रोजी ४.८६ मीटर, १६ जुलै रोजी ४.८५ मीटर, १३ ऑगस्ट रोजी ४.८५ मीटर उंचीच्या लाटा समुद्रकिनाऱ्यावर उसळतील. त्यामुळे नागरिकांनी या दिवशी विशेष काळजी घ्यावी. किनाऱ्यावर लाटा धडकत असताना तेथे जाऊ नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.