मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाऊलखुणा मिटण्याऐवजी आणखी खोलवर रुजतील. दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांसारख्या अनेक समाजसुधारकांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली, अशा काळात जन्माला आलो याचा अभिमान वाटतो, असे मत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या आठवणींना उजाळा देत ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ या समूहाने जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने दाभोलकरांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन आयोजित केले आहे. ‘कसोटी विवेकाची’ या नावाने हे कला प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे १ नोव्हेंबपर्यंत प्रदर्शन होणार आहे. त्याचे उदघाटन शाह यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी डॉ. दाभोलकर यांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर, खासदार सुप्रिया सुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 दाभोलकरांच्या हत्येला दहा वर्षे झाली तरीही त्यांचे विचार ही तरुण पिढी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे याचा अभिमान वाटतो. लोक अजूनही अंधश्रद्धाळू असल्याचे दिसते. अशा वेळी  स्वत: माझ्या कृतीतून आणि भाषणांमधून त्यांना योग्य-अयोग्य काय, याची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्नशील असते, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. लढणे म्हणजेच जिंकणे असते, असे  डॉक्टर सांगत. मी अजूनही लढत आहे,  त्यांनी भलेही डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मारले असेल पण ते  विचारांना मारू शकले नाहीत, अशा भावना डॉ. शैला दाभोलकर यांनी व्यक्त केल्या.

भेड और भेडीया..

भाषण देण्यासाठी मी राजकारणी किंवा कोणत्या पक्षाचा नेता नाही, तर कलाकार आहे. त्यामुळे लेखकाच्या शब्दांमागील भाव प्रभावीपणे मांडणे हे माझे काम आहे, असे सांगून नसीरुद्दीन शाह यांनी ‘भेड और भेडीया’ ही गोष्ट सांगितली. जंगलातील निवडणुकीसाठी साध्या, सरळ मेंढय़ा आणि लांडगे उभे राहिले. संत, सन्मर्गी, रक्षणकर्ता, प्रशासक अशी प्रतिमा उभी करून लांडग्यांनी मेंढय़ांना भूरळ घातली आणि निवडून आले. मात्र, निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी लांडग्यांना रोज अल्पोपाहारासाठी एक कोकरू, दुपारी एक पूर्ण मेंढी आणि रात्री अर्धी मेंढी खाण्यास द्यावी असा नियम केला. असा गाभा असलेली कथा सादर करण्यापूर्वी डॉ. दाभोलकरांच्या कार्याशी या गोष्टीचा संबंध नाही. मात्र, एका चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला गोळय़ा घातल्या जातात आणि दहा वर्षांनंतरही खुनी सापडत नाहीत, अशा व्यवस्थेच्या विरोधात मात्र ही गोष्टी आहे, अशी टिप्पणीही शाह यांनी केली.