ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे ५.२० च्या सुमारास गोव्यामध्ये निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे नाना पाटेकर यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले माजी पोलीस अधिकारी दया नायक यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
२००४ मध्ये नाना पाटेकर यांनी केला होता अब तक छप्पन हा चित्रपट
२००४ मध्ये नाना पाटेकर यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याचं नाव होतं ‘अब तक छप्पन’ शिमीत अमीन दिग्दर्शित या चित्रपटात नाना पाटेकर यांनी साधू आगाशे हे पात्र साकारलं होतं. जे दया नायक यांच्यावर प्रेरित होतं. आता दया नायक यांनी एक पोस्ट लिहून नाना पाटेकर यांच्याबाबत काय वाटतं ते लिहिलं आहे.
दया नायक यांनी काय म्हटलं आहे?
नाना पाटेकर यांची जी भेट झाली होती त्याबाबत ही पोस्ट दया नायक यांनी केली आहे. जो व्हिडीओ दया नायक यांनी पोस्ट केला आहे त्यात दया नायक आणि नाना पाटेकर एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. दया नायक म्हणाले, माझा विश्वासच बसत नाही की तुम्ही या जगात नाही. काही दिवसांपूर्वीच तर आपण फोनवर बोललो होतो. ती आपली शेवटची चर्चा असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
वर्दीतला माणूस काय असतो दाखवून दिलंत-दया नायक
दया नायक म्हणाले तुम्ही एक उत्तम अभिनेते होतात नाना. तुम्ही एखादी भूमिका करताना त्या भूमिकेशी एकरूप होऊन जायचात तुम्ही ज्या भूमिका केल्या त्यात तुमचा जीव ओतलात आणि ती भूमिका साकारली. तुम्ही माझ्यावरून प्रेरित असलेलं एका पोलिसाचं पात्र साकारलंत, पण तुमची ती भूमिका पाहून मला प्रेरणा मिळाली. तुम्ही फक्त एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली नाहीत तर वर्दीच्या मागे लपलेला पोलीस अधिकाऱ्यातला माणूस काय असतो तेदेखील दाखवलं. त्याची माणुसकीही दाखवलीत. पोलीस अधिकारी असण्याचा खरा अर्थ काय ते तुम्ही तुमच्या भूमिकेतून दाखवून दिलंत. तुम्ही साधू आगाशे ही भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे आणि त्याचे अंतरंग दाखवणारी केलीत. असं म्हणत दया नायक यांनी नाना पाटेकर यांच्याबाबत पोस्ट लिहिली आहे. तसंच तुम्ही एक चांगले मित्र होतात, कुणालाही मदत हवी असेल तर धावून जायचात. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी तुम्हाला ओळखत होतो आणि तुम्ही मला. तुमची खूप आठवण येईल नाना. असं म्हणत दया नायक यांनी ही पोस्ट लिहिली आहे.
