महिला दिनानिमित्त विद्यार्थिनीना भेट
मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील वसतिगृह चोवीस तास खुले करून कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी विद्यार्थिनींना महिला दिनानिमित्त विशेष भेट दिली आहे. यामुळे आता संकुलातील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी चोवीस तास संकुलात वावरू शकणार आहेत.




कालिना संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे दरवाजे रात्री ११ वाजता तर मुलांच्या वसतिगृहाचे दरवाजे रात्री १२ वाजता बंद होत असे. मात्र मुलींच्या आणि मुलांच्या वसिगृहांच्या वेळात हा भेदभाव का? असा प्रश्न उपस्थित करत अखिल भारतीय विद्यार्थी सेनेने सर्व वसतिगृहांना सारखेच नियम लागू करण्याची मागणी केली होती. याचबरोबर संकुलातील ग्रंथालय चोवीस तास खुले करावे अशी मागणीही केली होती. या मागणीचा विचार करत विद्यापीठ अनुदान आयोगांच्या नियमांना अधीन राहून विद्यार्थ्यांना संकुलातील शैक्षणिक सुविधांचा वापर करण्यासाठी वसतिगृहाचे दरवाजे चोवीस तास खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. जर विद्यार्थ्यांना संकुला बाहेर जायचे असेल तर त्यांना एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. याचबरोबर ‘संकुलाबाहेरील सुरक्षेची जबाबदारी माझी असेल त्याचा विद्यापीठाशी काही संबंध नसेल’ असे हमीपत्र द्यावे लागणार आहे.