scorecardresearch

आठवडय़ाची मुलाखत: पुढील दहा वर्षांत भारत व्हीएफएक्स क्षेत्रात अग्रणी ठरेल!

‘डीएनईजी’ स्टुडिओच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथे पार पडला. ‘डय़ून’ या साय-फाय पटातील व्हीएफएक्ससाठी ‘डीएनईजी’ या जगप्रसिद्ध व्हीएफएक्स स्टुडिओला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रतिनिधीक छायाचित्र

नमित मल्होत्रा
‘डीएनईजी’ स्टुडिओच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथे पार पडला. ‘डय़ून’ या साय-फाय पटातील व्हीएफएक्ससाठी ‘डीएनईजी’ या जगप्रसिद्ध व्हीएफएक्स स्टुडिओला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्हीएफएक्ससाठी सातव्यांदा ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या या कंपनीचे नेतृत्व हे नमित मल्होत्रा यांच्याकडे आहे. ‘डीएनईजी’ या स्टुडिओची सूत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नमित मल्होत्रा सांभाळत आहेत. नमित यांच्या मते पुढच्या दहा वर्षांत आपला भारत देश व्हीएफएक्स क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळखला जाईल.’

 • डीएनईजी’ने ‘डय़ून’ चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्साठी सातव्यांदा ऑस्कर सन्मान मिळवला आहे. यावर्षी ‘डय़ून’ आणि ‘नो टाईम टु डाय’ हा बॉण्डपट दोन्हीसाठी स्टुडिओला ऑस्कर नामांकन मिळाले होते. ऑस्कर विजयाचा हा क्षण.. याविषयी काय वाटते?
  चित्रपटातून कथा रंगवत असताना व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून काय कमाल साधता येईल, याचे नवीन मापदंड ‘डय़ून’ने निर्माण केले आहेत. व्हिज्युअल इफेक्ट्सच्या क्षेत्रात आम्ही गेले काही वर्ष जे काम केले आहे त्याचे चांगले परिणाम ‘डय़ून’सारख्या चित्रपटातून दिसून येतात. त्यामुळे यापुढे व्हीएफएक्सचा विचार करताना ‘डय़ून’ पूर्वी आणि नंतर अशा दोन टप्प्यात चर्चा होईल, असे मला वाटते. ‘नो टाईम टु डाय’ हाही व्हीएफएक्ससाठी ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला बॉण्डपट आहे. ‘डीएनईजी’चा अध्यम्क्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी जेव्हा या पुरस्कारांकडे पाहतो तेव्हा एक भारतीय म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून येतो. मुंबईत एका छोटय़ाशा गॅरेजमधून मी माझ्या व्हीएफएक्स व्यवसायाची सुरुवात केली होती. हॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हाही शून्यातून सगळे विश्व उभारले. या क्षणी जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जे भारतीय साध्य करू शकत नाहीत, हा ठाम विश्वास मला या यशाने दिला आहे.
 • १९९७ मध्ये ‘प्राईम फोकस’ची सुरुवात झाली होती. आत्ता ‘डीएनईजी’चे मुंबई, चेन्नई, चंदीगढपासून लॉस एंजेलिस, मॉन्ट्रियाल, व्हॅन्कॉव्हर असे ठिकठिकाणी स्टुडिओ आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत हा छोटेखानी व्हीएफएक्स उद्योग मोठा करताना नेमकी काय आव्हाने होती?
  आमचे कुटुंब गेली कित्येक दशके चित्रपट उद्योगात कार्यरत आहे. माझे वडील नरेश मल्होत्रा हे निर्माते म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखले जातात. त्यांनी पहिल्यांदा प्रॉडक्शन आणि त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शन युनिट सुरू केले होते. पहिला डिजिटल ऑडिओ स्टुडिओ त्यांनी सुरू केला. मी जेव्हा व्हीएफएक्स आणि अॅसनिमेशन संबंधित व्यवसाय सुरू करायचा ठरवला तेव्हा फारसा कोणाला विश्वास बसत नव्हता. मी स्वत: वीस वर्षांचा कुठलाही फारसा अनुभव नसलेला तरुण होतो. आता आपण डिजिटल आशय आणि तंत्रज्ञानाच्या गप्पा मारतो आहोत. तेव्हा संगणक हाही फार मोठा विषय नव्हता. त्यावेळी तीन व्हिज्युअल ग्राफिक आर्टिस्टच्या मदतीने मी माझ्या वडिलांच्या गॅरेजमध्येच व्यवसायाची सुरुवात केली होती. हळूहळू आम्ही बॉलिवूडमध्ये जम बसवत गेलो, अर्थात तेव्हा हिंदी चित्रपटही व्हीएफएक्सच्या बाबतीत फारसा गांभीर्याने विचार करत नव्हते. त्यामुळे त्यावेळीही आमच्याकडे हॉलिवूडपटांचेच काम मोठय़ा प्रमाणावर केले जात होते. व्हीएफएक्सचा वापर करून प्रचंड यशस्वी ठरलेले चित्रपट पाहिल्यानंतर हिंदी चित्रपट निर्माते झ्र् दिग्दर्शक यांनीही व्हीएफएक्स तंत्रावर जोर द्यायला सुरुवात केली.
 • २०१४ मध्ये तुम्ही लंडनस्थित ‘डबल निगेटिव्ह’ (डीएनईजी) हा स्टुडिओ घेतला. हॉलिवूडमध्ये पाय रोवण्यासाठी या भागीदारीचा खऱ्या अर्थाने फायदा झाला का?
  हॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्हीकडच्या कामाच्या पद्धती खूप वेगळय़ा आहेत. एकीकडे ओळखी आहेत, व्यावसायिकताही आहे. तर दुसरीकडे हॉलिवूडमध्ये मोठमोठय़ा स्टुडिओचे वर्चस्व आहे. तिथे आम्ही भारतात इतकी वर्ष काम करतो आहोत, वगैरे सांगून काम मिळवणे शक्यच नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांसाठी काम करण्याचा अनुभव नसेल तर तिथे प्रवेश मिळवणे अवघड होते. त्यामुळे ‘डीएनईजी’सारख्या ह़ॉलिवूडमध्ये व्हीएफएक्स क्षेत्रात काही एक नाव मिळवलेल्या स्टुडिओला आपल्या पंखाखाली घेणे हा चांगला आणि यशस्वी निर्णय ठरला. या भागीदारीमुळे हॉलिवूडमध्ये व्हीएफएक्स क्षेत्रात शिरकाव करणे तुलनेने सोपे आणि कमी वेळात तिथपर्यंत थेट पोहोचवणारे ठरले. तिथे व्यवसाय सुरू करणे हे पुन्हा नव्याने व्हीएफएक्सची बाराखडी गिरवण्यासारखे होते.
 • ‘डीएनईजी’ ताब्यात घेतल्यानंतरची या क्षेत्रातील वाटचाल कशी होती?
  ‘डीएनईजी’ घेतल्यानंतर पुन्हा ड्रॉईंग बोर्डवर बसण्यापासून सुरुवात करावी लागली होती. हॉलिवूडमधील स्टुडिओ संस्कृती ही आपल्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. जगभरातील स्टुडिओमधून त्यांच्या चित्रपटांचे काम चालते. त्यामुळे त्यांच्या चित्रपट निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यापासून आव्हानांची मालिका सुरू झाली होती. इथे तंत्रज्ञान आणि कला दोन्हींचा अचूक मेळ साधायचा होता. व्हीएफएक्ससारख्या क्षेत्रात तुमच्याकडे फक्त उत्तम कला आणि कलाकार असून चालत नाही. तुम्हाला व्यवसायवृद्धीचे गणितही समजून शिकून घ्यावे लागते. मी माझ्या कुटुंबासह लंडनला आलो. इथेच स्थायिक होऊन दिवसरात्र काम केले. इथली चित्रपट वितरण व्यवस्था, निर्मिती प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि व्हीएफएक्सची कला या तिन्हीच्या बळावर आमची वाटचाल सुरू झाली. पूर्वी पोस्ट प्रॉडक्शनसाठी काम करतानाही फारसे आम्हाला विचारात घेतले जायचे नाही. आता दिग्दर्शक कोण हे निश्चित करण्याआधीही कथा घेऊन स्टुडिओ आमच्याकडे पोहोचतात. पटकथा लेखनापासून आम्ही चित्रपटात सहभागी असतो. कथा व्हीएफएक्स आणि अॅ निमेशनच्या मदतीने कशी पुढे जाईल?, याबद्दल विचार विनिमय करून मग दिग्दर्शक, कलाकार आदी गोष्टी ठरवल्या जातात. हा खूप मोठा बदल आहे.
 • फिक्कीच्या अहवालानुसार भारतातील व्हीएफएक्स इंडस्ट्रीची उलाढाल ३८.२ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचली असून १०३ टक्क्याने यात वाढ झाली आहे. तुम्ही याविषयी काय सांगाल?
  फिक्कीने नमूद केलेली व्हीएफएक्स क्षेत्रातील आर्थिक उलाढाल ही आम्ही गेले काही वर्ष या क्षेत्रात जे काम केले आहे त्याची परिणती म्हणता येईल. याआधी व्हीएफएक्स उद्योग हा इतर देशांमध्ये जास्त होता, मात्र भारतीय व्हीएफएक्स आर्टिस्ट्स आणि त्यांच्या कामामुळे बरेचसे जागतिक दर्जाचे काम हे भारतीय व्हीएफएक्स स्टुडिओमधून मोठय़ा प्रमाणावर केले जाते आहे. डिजिटल आशयनिर्मितीची वाढलेली मागणीही यासाठी मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत ठरली आहे. ओटीटी माध्यमांमुळे आशय निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. दुसरे म्हणजे व्हीएफएक्सचे काम जगभरात कुठेही बसून केले जाऊ शकते. मुंबई, मॉन्ट्रियाल, लंडनमध्ये जगभरात कुठल्याही ठिकाणी बसून वेगवेगळय़ा चित्रपटांच्या व्हीएफएक्सचे काम एकावेळी हाताळले जाऊ शकते, हा तंत्रज्ञानाचाही फायदा या क्षेत्राला झाला आहे. व्हीएफएक्स आणि अँनिमेशन क्षेत्रात मोठी झेप घेण्याची क्षमता भारतीय आर्टिस्ट्कडेच आहे. पुढच्या दहा वर्षांत भारतच या क्षेत्रातील अग्रणी ठरेल, हे मी खात्रीने सांगू शकतो.
  मुलाखत – रेश्मा राईकवार

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Interview week next ten years india leader in the field vfx amy

ताज्या बातम्या