विदिता वैद्य यांच्याशी ‘व्हिवा लाउंज’मध्ये आज संवाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुद्धीचे ऐकायचे का मनाचे, असे द्वंद्व नेहमी अधोरेखित केले जाते. वास्तविक ही सर्व भावनांची द्वंद्वे आपल्या मेंदूतच सुरू असतात. या मेंदूमधील मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक विदिता वैद्य करत आहेत. मन श्रेष्ठ की मेंदू, मेंदूची रचना नेमकी कशी आहे, मेंदू आणि भावनांचे नाते काय, ताण-तणावांचा मेंदूवर परिणाम होतो का, नैराश्य येते म्हणजे नेमके काय होते, मेंदूच्या रचनेत बदल होतात का? अशा अनेक प्रश्नांची उकल आज दादरमध्ये होणाऱ्या ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मध्ये होणार आहे. मेंदू विज्ञान क्षेत्रात मोलाचे संशोधन करणाऱ्या विदिता वैद्य यांच्याशी थेट संवाद साधायची संधी उपस्थितांना मिळणार आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तम कामगिरी करत स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या कर्तबगार तरुण स्त्रियांना ‘व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर आमंत्रित केले जाते. त्यांच्याशी मुक्त संवादाचा हा कार्यक्रम असतो. त्यांच्या यशोगाथेतून नवी प्रेरणा मिळण्याचा यामागचा उद्देश आहे. विदिता वैद्य यांना नैराश्य आणि तणाव यांच्यावरील औषधांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी उपयुक्त संशोधन केल्याबद्दल नुकताच प्रतिष्ठेचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांना भारत सरकारतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. मुंबईच्या सेंट झेविअर्स महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विदिता अमेरिकेत गेल्या. तेथील येल विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात पुढील संशोधन केले. त्यानंतर भारतात परतून पुढील संशोधन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गेली १५ वर्षे मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (टीआयएफआर) त्या कार्यरत आहेत. मेंदूचा विकास होत असताना लहान वयात नेमक्या कुठल्या कारणांमुळे मेंदूवर सर्वात जास्त परिणाम होतो, याचा वेध घेतला जाणार आहे.

कार्यक्रम कधी?-
आज, १५ ऑक्टोबर, संध्या. ४.४५ वा.

कुठे?-
स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर.
प्रवेश विनामूल्य.
(प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)

 

 

 

 

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview with vidita vaidya in viva launch
First published on: 15-10-2015 at 02:00 IST