लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वडाळा ॲन्टॉप हिल येथे मे महिन्यात एका इमारतीची वाहनतळाची परांची कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी करावी, तसेच जखमींना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक अमेय घोले यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. मे महिन्यात झालेल्या तीव्र वादळात ही परांची कोसळली होती. त्यात दोन जण जखमी झाले होते.

वडाळ्यामधील बरकत अली नाका येथील एका इमारतीची पार्किंगची धातूची संपूर्ण परांची १३ मे रोजी कोसळली होती. श्री जी टॉवर या इमारतीची ही परांची रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळली. वादळी वाऱ्यामध्येही ही धातूची परांची अक्षरश उडत जमिनीवर आदळली. या दुर्घटनेत आठ ते दहा गाड्या दबल्या गेल्या. तर दोन जण जखमी झाले होते. त्यापैकी एक जण गाडीत अडकला होता. या घटनेला आता एक महिना झाला असून या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. याप्रकरणी वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

आणखी वाचा-Monsoon Update : मुंबईत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता

या प्रकरणात विकासकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असून पालिका आणि पोलीस यांनी या दुर्घटनेची योग्य ती दखल घेतली नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे जखमींना न्याय मिळाला नसल्याचेही घोले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्याच दिवशी घाटकोपरच्या छेडानगरमध्ये जाहिरात फलक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, कारवाई झाली व नुकसानभरपाई देखील मिळाली. पण वडाळ्याच्या दुर्घटनेची दखल घेतली नाही, असे घोले यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेतील जखमींना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, संबंधित विकासकाविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणाची चौकशी करावी, अशी मागणी घोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

वडाळ्यातील गणेश सेवा झोपडपट्टीचे झोपु योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात येत होते. या प्रकल्पातील पुनर्वसित आणि विक्रीसाठीच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून पार्किंग टॉवरचे काम सुरू होते. ३० ते ४० मीटर उंच पार्किंग टॉवर येथे उभारण्यात येते होता. यासाठी ३० ते ४० मीटर उंच स्टीलचा ढाचा उभारण्यात आला होता. त्यावर काँक्रीटीकरण करण्यात येणार होते. वादळी वाऱ्यात हा टॉवर कोसळला.