मुंबई : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावर आढळलेल्या नौकेबाबत स्थानिक पोलिसांबरोबरच दहशतवादविरोधी पथक सखोल तपास करीत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. याबाबत भारतीय तटरक्षक दल आणि केंद्रीय यंत्रणांशी संपर्कात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

   रायगडमध्ये शस्त्रसाठा असलेली नौका आढळल्याबद्दलचा मुद्दा राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला. ही बाब गंभीर असल्याने त्यावर सरकारने भूमिका मांडण्याची मागणी जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदनात घटनाक्रम सांगितला. 

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावर १६ मीटर लांबीची नौका दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळली. पोलिसांनी सदर नौकेची तपासणी केली असता त्यात तीन ए. के. रायफल्स, दारुगोळा आणि बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळली. या नौकेचे नाव ‘लेडीहान’ असून, या नौकेच्या मालक ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या आहेत. तिचा पती जेम्स हॉबर्ट हा नौकेचा कप्तान होता. ही नौका मस्कतहून युरोपकडे जाणार होती. या नौकेचे इंजिन २६ जून रोजी निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी याचना केली. एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला पाठविले. समुद्र खवळलेला असल्याने नौकेचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळेच ही नौका भरकटत हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागली, असे भारतीय तटरक्षक दलाकडून कळविण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

सतर्कतेचे आदेश

नौका भरकटत हरिहरेश्वर आल्याची माहिती तटरक्षक दलाकडून मिळाली असली तरी आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे हरिहरेश्वरसह उरणच्या मोरा किनाऱ्यावरही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.