मुंबई : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आणि आयपीएलच्या अंतिम सामान्यानिमित्त पश्चिम रेल्वेद्वारे मुंबई ते अहमदाबाददरम्यान विशेष भाड्याने दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांमुळे उन्हाळी हंगामातील प्रवाशांसह आयपीएलप्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे. आयपीएलप्रेमींचा प्रवास जलदगतीने आणि किफायतशीर होणार आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२६ चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स जात असून यांच्यात सामना रंगणार आहे. अनेक आयपीएलप्रेमी मुंबईवरून अहमदाबाद येथे जाणार आहेत. त्यांच्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक ०९०२१ मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वातानुकूलित अतिजलद विशेष रेल्वेगाडी ३१ मे रोजी मुंबई सेंट्रल येथून सकाळी ६.२० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १२.४० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ०९०२२ अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल वातानुकूलित अतिजलद विशेष रेल्वेगाडी ३१ मे रोजी अहमदाबाद येथून दुपारी ३.१० वाजता सुटून रात्री ९.४५ वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. शताब्दी रेकवर आधारित या गाडीत एक्झिक्युटिव्ह चेअरकार, वातानुकूलित चेअरकार, अनुभूती क्लास तसेच विस्टाडोम डबा असेल.
गाडी क्रमांक ०९०४४ अहमदाबाद ते वांद्रे टर्मिनस अतिजलद विशेष रेल्वेगाडी १ जून रोजी रात्री ३.५० वाजता अहमदाबाद येथून सूटून दुपारी १२.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहचेल. तसेच गाडी क्रमांक ०९०४३ वांद्रे टर्मिनस ते वटवा अतिजलद विशेष रेल्वेगाडी १ जून रोजी रात्री ११.४५ वाजता वांद्रे टर्मिनस येथून सुटून २ जून रोजी सकाळी ८ वाजता वटवा येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०९०४४ या रेल्वेगाडीला वडोदरा, भरूच, सुरत, वापी, पालघर आणि बोरिवली स्थानकांवर थांबा असेल.
तर, गाडी क्रमांक ०९०४३ या रेल्वेगाडीला बोरिवली, पालघर, वापी, उधना, वडोदरा, आनंद आणि नडियाद स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेगाड्यांमध्ये तृतीय वातानुकूलित श्रेणीचे आणि शयनयान श्रेणीचे डबे असतील. गाडी क्रमांक ०९०२१ /०९०२२ आणि ०९०४४ /०९०४३ या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण ३० मे पासून सर्व पीआरएस खिडक्या, तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
