चरस पुरवणाऱ्या शब्बोचा शोध सुरू

चरस, कोकेन आणि अविरत सिगारेटी ओढण्याचे व्यसन जडलेला इकबाल कासकर ठाणे पोलिसांच्या कोठडीत प्रचंड अस्वस्थ आहे. अटकेनंतर पहिले दोन दिवस माहिती दडवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा इकबाल याच अस्वस्थतेतून पोपटासारखा बोलतोय. त्याची ही पोपटपंची खंडणीविरोधी पथकाच्या पथ्यावर पडते आहे.

दरम्यान, खंडणीविरोधी पथकाने इकबालला हिमाचल प्रदेशातील उच्च प्रतीचे चरस उपलब्ध करून देणाऱ्या शब्बो गधा याचा शोध सुरू केला आहे. पाकमोडिया स्ट्रीटवरील घरात इकबालच्या सेवेत असलेल्या प्रत्येकाला खंडणीविरोधी पथकाने चौकशीसाठी बोलावले आहे. त्यात शब्बोचा भाऊ खालिद याची चौकशी झाल्याचे समजते. या दोघांचा मोठा भाऊ समद इकबालचा जवळचा मित्र होता. मात्र अरुण गवळी टोळीसोबतच्या टोळीयुद्धात समदची हत्या झाली. त्यानंतर शब्बो, खालिद यांनी समदची जागा घेत इकबालची सेवा सुरू केली.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी ५च्या सुमारास इकबालचा दिवस सुरू होई. शब्बो, खालिद आणि अन्य सेवकांच्या गराडय़ात चरस, कोकेनची नशा, चमचमीत जेवण बनवण्याचा कार्यक्रम, गप्पागोष्टी करून इकबाल सकाळी आठच्या आसपास झोपे. मात्र, पोलीस कोठडीत सिगारेटही वज्र्य करण्यात आल्याने इकबाल कासावीस आहे. अटकेनंतर पहिल्या दोन दिवसांमध्ये ‘मेरा और आप का ब्लड एक ही है!’ (इक्बालचे वडील पोलीस होते म्हणून) असा संवाद फेकून चौकशी टाळत होता. मात्र अमली पदार्थ न मिळाल्याने त्याची चिडचिड वाढली. एकीकडे ‘मोक्का’ लावण्याची भीती घालून खंडणीविरोधी पथक त्याच्याकडे कसून चौकशी करत आहे. त्यातच चरस, कोकेन बंद झाल्याने इकबाल घायकुतीला आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सध्या इकबाल पोपटासारखा सर्व प्रश्नांची उत्तरे देतोय, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दिवसाचा २५ ते ३० हजार खर्च ..

ताजे मासे, मटण, घरी बनवलेल्या तयार पदार्थाची इक्बालच्या घरी रेलचेल असे. इकबालचा एका दिवसाचा खर्च २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत होता. ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केल्यापासून इकबाल या राजेशाही थाटाला मुकला आहे.